Samruddhi Mahamarg : प्रतीक्षा संपली, समृद्धी महामार्गावर सुसाट वेगात वाहने धावली; नियम पाळा अन्यथा दंडाचा भुर्दंड | पुढारी

Samruddhi Mahamarg : प्रतीक्षा संपली, समृद्धी महामार्गावर सुसाट वेगात वाहने धावली; नियम पाळा अन्यथा दंडाचा भुर्दंड

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली. ती आज प्रत्यक्षात उतरली आहे. सुसाट समृद्धी महामार्गावरून वाहने निघाली. भाविकांची एक खासगी बस शिर्डी दर्शनासाठी आज नागपुरातून श्रीकांत शिंदे, पूर्व विदर्भ समनवयक किरण पांडव यांच्या पुढाकाराने रवाना झाली.

विमानतळावर या बसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला. ५२० किलोमीटर अंतराचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डीचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तत्पूर्वी त्यांनी या मार्गाच्या एंट्री पॉइंटवर पाहणी करून १० किलोमीटर प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

वेगमर्यादा ओलांडताच आपोआप खात्यातून दंडाची रक्कम वजा

नागरिकांचीही या मार्गावरून प्रवासाची प्रतीक्षा संपली असून, नागपूर व शिर्डी अशा दोन्ही बाजुने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वाहनचालविताना नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. वेगमर्यादा ओलांडताच आपोआप खात्यातून दंडाची रक्कम वजा होईल. यामुळे या मार्गावरून बिनधास्त प्रवास करा पण मनाचा ब्रेक कायम असू द्यावा लागणार आहे.

राज्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या महामार्गाबद्दत वाहनचालकांमध्ये प्रचंड आकर्षण पूर्वीपासूनच दिसून येत हाेते. अनेकांनी उद्घाटनापूर्वीच या मार्गावरून प्रवासाची हौस भागवूनही घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकाच वाहनातून या मार्गावर राईड केली. आता हा मार्ग सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. लोकार्पण होताच दोन्ही बाजुने अनेक वाहने पुढच्या प्रवासाला रवाना झाली. वाहनचालकांनी मार्ग खुला झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.

टोलची प्रक्रिया सुटसुटीत.. 

या मार्गावर जेवढा प्रवास केला तेवढाच टोल भरावा लागेल. शिर्डी ते औरंगाबाद प्रवास केल्यास तेवढाच टोल फास्टॅगमधून वजा होणार आहे. ठाणे ते नागपूर संपूर्ण महामार्ग जेव्हा सुरू होईल, तेव्हाही ठाण्याला टोल भरावा लागणार नाही, तर थेट नागपूरला पोहोचल्यावर फास्टॅगमधून टोलची रक्कम कापली जाणार आहे.

यासंदर्भात नितीन गडकरी लोकसभेत म्हणाले की, महामार्ग बांधून सोडून देता येत नाही, तर त्याची वेळोवेळी देखभालही करावी लागते. त्यामुळे टोल नागरिकांना द्यावाच लागेल. या महामार्गावर वन्यप्राण्यांचीही सोय करण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ ओव्हरपासही बनवलेले आहेत. सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यामुळे वेग आवाक्यात ठेवावा लागणार आहे. कारण वेगमर्यादा ओलांडली तर थेट १ हजार रुपये एका चालानचे द्यावे लागणार आहेत. नियम वारंवार मोडल्यास चालानची रक्कम वाढत जाते.मात्र, तूर्तास वाहनात काही बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था काहीही नसल्याचे दिसले.

हेही वाचा  : 

Back to top button