पुढारी ऑनलाईन डेस्क : वैयक्तिक स्वार्थातून देश घडत नाही. काही राजकीय पक्ष फक्त आपला वैयक्तिक स्वार्थ बघत आहेत. शॉर्टकटने देशाची प्रगती होऊ शकत नाही, त्यासाठी लाँर्ग टर्म व्हिजन गरजेचे आहे. सत्तापिपासू देशाला पुढे नेऊ शकत नाही. सत्तेत येणे हाच काहींचा उद्देश असून अशा स्वार्थी राजकीय नेत्यांचे पितळ उघडे पाडा, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. ११ ) विरोधकांवर हल्लाबोल केला. (Samruddhi Mahamarg)
'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) आणि नागपूरमधील विविध विकासकामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि. ११) लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
आज या शानदार सोहळ्यात स्वतः मोदी यांनी ढोलताशा पथकाशी संवाद साधतानाच ढोल वाजविला. वायफळ टोलनाकापर्यंत त्यांनी समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर राईड केली. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या निनादात जल्लोषात त्यांचे या ठिकाणी स्वागत झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करत आज संकष्टी चतुर्थी आहे. गणपती बाप्पांना वंदन करूया, असे म्हणत टेकडीवरच्या गणपतीला वंदन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नागपूरला ११ तारकांच्या नक्षत्रांची भेट दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला ७५ हजार कोटींच्या विकासकामांची भेटही दिली आहे. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास गरजेचा आहे. डबल इंजिन सरकार वेगाने काम करत आहे, असे सांगून मोदी यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचे कौतुक केले. नागपूर-मुंबई समृद्धी मार्गामुळे शेतकरी, उद्योजकांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल जलद गतीने मुंबईच्या बाजारपेठेत पाठवता येणार आहे. दळणवळणामुळे देशभरातील प्रार्थनस्थळांचा विकास होत आहे. कारण विलंबामुळे महाराष्ट्रातील गोसेखुर्द प्रकल्पाचा खर्च ४०० कोटींहून १८ हजार कोटींवर गेला. अशी असंवेदनशीलता कोणत्याही प्रकल्पात दाखवू नये, असेही त्यांनी नमूद केले.
देशभरात पायाभूत सुविधा देताना ह्युमन टच देणे महत्त्वाचे आहे. गेल्या ८ वर्षांत दृष्टीकोन बदललेला आहे. पुढील २५ वर्षांचे लक्ष्य ठेवून व्हिजन आखणे गरजेचे आहे. 'आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया' हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीची संधी भारत गमावू शकत नाही. ही संधी वारंवार येऊ शकत नाही. त्यामुळे या संधीचे सोने करणे आवश्यक आहे. अशावेळी शाश्वत विकासाच्या माध्यमातूनच आम्ही विकास करू शकतो. त्यासाठी आपल्या पायाभूत सुविधा अद्ययावत करणे आवश्यक आहे. जगातील अनेक देशांनी पायाभूत सुविधांचा विकास करून उन्नती केली आहे. या सर्व देशांनी देशातील करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग केला. उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. त्यामुळे सरकारी खजिन्याचा प्रत्येक पैसा सामान्यांच्या विकासासाठी वापरला गेला पाहिजे. भारताला शाश्वत विकास व शाश्वत समाधानाची संधी आहे. त्यामुळे ही संधी आम्ही गमावणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जे मागे राहिले त्यांना, जे वंचित राहिले त्यांना, ज्यांना, छोटे समजले गेल, त्यांना पुढे आणण्याचे काम आम्ही करत आहोत. देशातील शंभर जिल्हे अजूनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये विकासापासून वंचित आहेत, अशा वंचित क्षेत्रांना विकासाचे केंद्र बनवण्याची आमची मनीषा आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगतिले.
हेही वाचलंत का ?