औरंगाबाद : ४५ हजारांची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामविकास अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

औरंगाबाद : ४५ हजारांची लाच घेताना विस्तार अधिकाऱ्यासह ग्रामविकास अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पाचोड; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आडूळ बु येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सार्वजनिक शौचालय बांधकामाचे २ लाख १० हजारांचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी ४५ हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. ७) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आडूळ (ता. पैठण) ग्रामपंचायत कार्यालयात केली. पैठण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा आडूळ बु ग्रामपंचायतीचे प्रशासक अशोक सूर्यभान घोडके (वय ३६) आणि आडूळ बु. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळमकर (वय ५६) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांच्या वाहिनी ह्या आडूळ बु गावाच्या माजी सरपंच होत्या. त्यांना त्यांच्या कार्यकाळात येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सार्वजनिक शौचालयाचे काम मिळाले होते. सदर काम तक्रारदार यांनी पूर्ण करून २ लाख १० हजार रूपयांचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी विस्तार अधिकारी तथा प्रशासक अशोक सूर्यभान घोडके व ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळमकर यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी विस्तार अधिकारी तथा प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी सदरील कामाचे मंजूर बिलाचे चेक काढण्यासाठी त्या तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सरळ औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर त्या दोघांना पकडण्यासाठी आज दुपारी आडूळ बु. येथे सापळा रचला.

यावेळी विस्तार अधिकारी तथा प्रशासक अशोक सूर्यभान घोडके व ग्रामविकास अधिकारी बळीराम दगडू कळमकर या दोघांनी तडजोडीअंती ४५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस अंमलदार भीमराव जिवडे, विलास चव्हाण, पोलीस नाईक दिंगबर पाठक, चालक बागुल यांनी केली.

या कारवाईमुळे पैठण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. येत्या १८ डिसेंबर २०२२ रोजी आडूळ बु ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडणार आहे. पूर्वीच्या सरपंचचा कार्यकाल संपल्याने येथील ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक म्हणून अशोक घोडके यांनी पदभार घेतला होता. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का  ? 

Back to top button