तामिळनाडू, पुद्दुचेरीसह पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना रेड अलर्ट; NDRF च्या टीम दाखल | पुढारी

तामिळनाडू, पुद्दुचेरीसह पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना रेड अलर्ट; NDRF च्या टीम दाखल

पुढारी ऑनलाईन: दक्षिण अंदमान क्षेत्रभागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची तयार होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी करत तामिळनाडू, पुद्दुचेरीसह पूर्व किनारपट्टीवरील राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सतर्कतेचा इशारा लक्षात घेत, तामिळनाडू, पुद्दुचेरीसह किनारपट्टीलगतच्या भागात  NDRF च्या सहा टीम दाखल झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर NDRF अरक्कोनमची सहा पथके नागापट्टिनम, तंजावर, थिरुवरूर, कुड्डालोर, मायिलादुथुराई आणि चेन्नई येथे दाखल झाल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ६ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत ते पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकून आग्नेय बंगालच्या उपसागरात दाब बनण्याची शक्यता आहे. ते पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ मंडौसमध्ये आणखी तीव्र होईल. ८ डिसेंबरच्या सकाळपर्यंत उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या दक्षिण आंध्रप्रदेशजवळ नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. यामळे जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी 40-45 किमी ते 70-80 किमी पासून 90 किमीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे तामिळनाडू आणि दक्षिण किनारपट्टीवरील आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ७ आणि ८ डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. उत्तर किनारपट्टीवर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे ७ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल आणि ८ आणि ९ डिसेंबरला पाऊस वाढेल. सोमवार आणि मंगळवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

Back to top button