नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवा | पुढारी

नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवा

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या देवगड दत्तजयंती उत्सवातील बंदोबस्तासाठी नेवासा होमगार्डची 50 वर्षे निष्काम सेवेची परंपरा आजतागायत सुरूच आहे. बुधवारी होणार्‍या उत्सवासाठी नेवासा होमगार्ड जवान सेवेसाठी सज्ज झाले आहेत. नेवासा होमगार्डची स्थापना सन 1952 साली झाली. श्री क्षेत्र देवगडचे मंदिर बांधकाम 1957 साली सुरू होते. मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर दत्तजयंती उत्सवाला श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी सुरुवात केली.

त्यावेळी ज्येेष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व.गोपाळराव थावरे हे होमगार्ड समादेशक म्हणून काम पाहत होते. तेव्हापासून दत्तजयंती उत्सवात निशुल्क भक्तांसाठी बंदोबस्त देऊन सेवा देण्यासाठी नेवासा होमगार्डने संकल्प केला होता. त्यानंतर स्वर्गीय विठ्ठलराव जंगले पाटील हे समादेशक झाले. त्यांनी देखील त्यावेळी पंधरा ते वीस होमगार्डला बरोबर दत्तजयंती उत्सवासाठी बंदोबस्त दिला. त्यानंतर ही परंपरा सुरूच राहिली.

भास्करगिरी बाबा देवगडचे उत्तराधिकारी झाल्यानंतर दिवसेंदिवस देवगडच्या दत्तजयंतीचा उत्सव हा पुढे बहरतच गेला. त्यात स्व. भाऊसाहेब पाठक यांनी सेवेची परंपरा पुढे सुरू ठेवली. आज होमगार्ड जवानांची संख्या दीडशेच्या वर जाऊन पोहचली आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी नेवासा तालुक्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्त देण्याचे काम होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.

दर रविवारी न चुकता होमगार्ड कार्यालयाच्या प्रांगणात परेड घेणे, होमगार्ड सुरक्षेच्या बाबतीत शिस्तीचे धडे देणे, हे काम सुरू आहे. जिल्ह्यात देखील प्रशिक्षण शिबिरे घेऊन होमगार्ड दलात प्रबोधन करणे, असे अनेक उपक्रम सुरू असल्याने जिल्ह्यात चांगल्या सेवेच्या बाबतीत पारितोषिके पटकावून होमगार्डने नेवासा तालुक्याचे नाव उंचावले आहे.

देवगड दत्तजयंती सोहळयात नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त देण्यासाठी होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे व जनसंपर्क अधिकारी सुधीर चव्हाण, पलटणनायक अशोक टेमकर, पोलिस पाटील दिलीप गायकवाड, श्रीकांत ससे, पलटणनायक दादासाहेब कणगरे, अल्ताफ शेख, राजेंद्र बोरुडे, अरुण देवढे, गफार शेख, उमेश इंगळे, होमगार्ड विकास बोर्डे, अशोक चव्हाण, मोहन गायकवाड, शकील शेख यांच्यासह 50 होमगार्ड व सहा महिला होमगार्ड सज्ज झाले आहेत.

Back to top button