नगर : आरोग्य केंद्रासाठीचे तीन कोटी पडून; शहरात 12 ठिकाणी होणार आरोग्य वर्धिनी केंद्र | पुढारी

नगर : आरोग्य केंद्रासाठीचे तीन कोटी पडून; शहरात 12 ठिकाणी होणार आरोग्य वर्धिनी केंद्र

नगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरात 12 आरोग्य वर्धिनी केंद्र उभारली जाणार आहेत. तिथे नागरिकांना प्रथमोपचार, लसीकरण, रक्त तपासणी अशा सेवा मिळणार आहेत. त्यासाठी शासनाकडून 7 कोटी 44 लाखाचा निधी मंजूर आहे. त्यातील तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. केंद्रासाठी सात ठिकाणी जागा उपलब्ध झाली असून, पाच ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. तर, नागरिकांकडून किरकोळ विरोधही होत आहे. त्यामुळे प्रक्रिया रखडल्याचे मनपा वर्तुळातून समजले.

नगरकरांचे स्वप्न असलेला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला झाला. तर, दुसरीकडे बुरूडगाव येथे नगरकरांसाठी अद्ययावत रुग्णालय उभारले जात आहे. या दोन गोष्टी नगरकरांना दिलासा देणार्‍या असताना केंद्र सरकारच्या योजनेतून शहरात 12 आरोग्य वर्धिनी केंद्र उभारले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळणे सुलभ होणार आहे. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागाच्या सहायक संचालकांच्या अधिपत्याखाली नगर शहरातील सात आरोग्य केंद्रांतर्गत 12 आरोग्य वर्धिनी केंद्र (अर्बन वेलनेस सेंटर) उभारली जाणार आहेत.

हा प्रकल्प 2021 22 ते 2025-26 अशा पाच वर्षांकरिता आहे. त्यासाठी नगर शहरात 12 ठिकाणी जागा निश्चितची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील सात ठिकाणी समाज मंदिर, मनपाच्या इमारतीत आरोग्य केंद्र उभारले जाणार आहे. तर, सात ठिकाणी भाडेत्त्वावर इमारत घेऊन केंद्र उभारले जाणार आहे. एक केंद्र उभारणीसाठी सुमारे 25 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी समन्वय विभाग जिल्हा परिषद असून, 12 केंद्रांसाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहे. तो निधी मनपाला वर्ग होण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातून फर्निचरसह विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे.

दरम्यान, आरोग्य केंद्रांसाठी नागरिकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे जागा निश्चितच्या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांना आरोग्याचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास एक महिन्यात आरोग्य केंद्र सुरू होतील, अशी आशा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

सध्या मनपाचे महात्मा फुले प्राथमिक आरोग्य केंद्र, बुरूडगाव आरोग्य केंद्र, तोफखाना आरोग्य केंद्र, सावेडी आरोग्य केंद्र, नागापूर आरोग्य केंद्र, मुकुंदनगर आरोग्य केंद्र, केडगाव आरोग्य केंद्र अशी सात आरोग्य केंद्र आहेत.

येथे होणार आरोग्य केंद्र
वैदूवाडी, सिद्धार्थनगर, शास्त्रीनगर (केडगाव), इंदिरानगर (अरणगाव रोड), फर्‍याबाग (सोलापूर रोड), संजयनगर, आगरकरमळा, तपोवन रोड, निर्मलनगर, बोल्हेगाव, नालेगाव, शिवाजीनगर (कल्याण रोड)

साठ कर्मचार्‍यांची भरती होणार
12 आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी सुमारे साठ अधिकारी व कर्मचार्‍यांची भरती करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये एक डॉक्टर, नर्स, एक वॉर्डबॉय व दोन सफाई कर्मचारी असे पाच कर्मचारी एका केंद्रात राहणार आहेत. त्यातील दोन कर्मचारी बाह्यसंस्थेमार्फत भरली जाणार आहे. भरती प्रक्रियेचा समन्वय जिल्हा परिषद सीईओ करणार आहेत..

आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी सात ठिकाणी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित पाच ठिकाणी भाडेतत्त्वावर इमारत घेऊन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

                                                              – डॉ. अनिल बोरगे,
                                                           आरोग्य अधिकारी मनपा.

Back to top button