Dominique Lapierre : ‘सिटी ऑफ जॉय’, ‘फ्रिडम ॲट मिडनाईट’चे लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचे निधन | पुढारी

Dominique Lapierre : 'सिटी ऑफ जॉय', 'फ्रिडम ॲट मिडनाईट'चे लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचे निधन

फ्रिडम ॲट मिडनाईट'चे लेखक डॉमिनिक लॅपिएर यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्‍या अखेरच्या वर्षांतील घटनाक्रमांवरील गाजलेले पुस्तक म्हणजे फ्रीडम ॲट मिडनाईट. या पुस्तकाचे लेखक डॉमिनिक लॅपिएर (वय ९१) यांचे आज फ्रान्समधील मार्सेली या शहरात निधन झाले. लॅपिर यांचे कोलकात्‍यातील रिक्षावाल्यांच्या जीवनावरील ‘सिटी ऑफ जॉय’ हे पुस्तकही प्रचंड गाजले होते. भारतावर नितांत प्रेम असलेल्या फ्रान्सच्या या लेखकाला २००८मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

फ्रीडम ॲट मिडनाईट हे पुस्तक लॅपिएर यांनी आणि अमेरिकन लेखक लॅरी कॉलिन्स यांच्यासमवेत लिहिले होते. लॅपिएर आणि कॉलिन्स यांनी एकत्रित ६ पुस्तके लिहिली. यातील ‘इज पॅरिस बर्निंग’ हे पुस्तक सर्वांधिक गाजले. १९८५ला लॅपिएर यांनी ‘सिटी ऑफ जॉय’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकावर नंतर इंग्रजी चित्रपटही आला होता.

पुस्तकातून मिळणाऱ्या रॉयल्टीचा मोठा भाग त्यांनी सामाजिक कार्यासाठी

‘सिटी ऑफ जॉय’ या पुस्तकातून मिळणाऱ्या रॉयल्टीचा मोठा भाग त्यांनी सामाजिक कार्यासाठी खर्च केला. १९८०च्या दशकात त्यांनी मदर तेरेसा यांना ५० हजार डॉलरची मदत देऊ केली. मदतीचा जो समुद्र हवा आहे, त्यातील हा एक थेंब आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते. कुष्ठरोगाने पीडित मुलांवर उपचारासाठी त्यांनी मोठी मदत केली होती.

लॅपिएर यांना बंगाली भाषा येत होती. सिटी ऑफ जॉय हा कादंबरीनंतर त्यांचे नाव पश्चिम बंगालमध्ये घरोघरी पोहोचले. आजही लॅपिएर यांचे नाव पश्चिम बंगालमध्ये आदराने घेतले जाते.

ऐतिहासिक घटनांचे सखोल संशोधन करून त्यांची नितांत सुंदर भाषाशैलीत मांडणी हे लॅपिएर आणि कॉलिन्स यांचे वैशिष्ट्य होते. फ्रिडम ॲट मिडनाईट हे पुस्तक १९७५ला प्रकाशित झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अखेरची वर्षं भारताची फाळणी, त्यानंतर नागरिकांचे झालेले स्थलांतर, दंगली, महात्‍मा गांधीजींची हत्या अशा सगळ्या घटनांचा दस्ताऐवज म्हणजे हे पुस्तक होय. या पुस्तकाची विविध भारतीय भाषांत भाषांतरे झाली आहेत. लॅपिएर आणि कॉलिन्स या दोघांचे अजून एक गाजलेले पुस्तक म्हणजे ‘ओ जेरुसलेम.’ हे पुस्तक इस्राईलच्या निर्मितीची कथा सांगण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button