Share Market Today | कच्च्या तेलाच्या भडक्याची शेअर बाजाराला झळ, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण | पुढारी

Share Market Today | कच्च्या तेलाच्या भडक्याची शेअर बाजाराला झळ, सेन्सेक्स, निफ्टीत घसरण

Share Market Today : जागतिक संकेत सकारात्मक आहेत. पण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या वाढल्याने भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांक आज सोमवारी (दि.५) घसरले. ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स (BSE) सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात ३०० हून अधिक अंकांनी घसरून ६२,५०० वर आला. तर निफ्टीही ९० अंकांनी खाली येऊन १८,६०० वर व्यवहार करत होता. चीनमधील शहरांनी कोव्हिड संदर्भातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. दरम्यान, आज इतर आशियाई बाजारांत तेजी दिसून आली. पण भारतीय शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड दिसून आला.

हिंदाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सिप्ला आणि अदानी पोर्ट्स हे आज NSE वर सर्वाधिक २.२८ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. एचडीएफसी, एचयूएल, ब्रिटानिया, एशियन पेंट्स आणि एसबीआय लाईफ यांचे शेअर्स मागे पडले होते. बीएसईवर १,९३४ शेअर्स वाढताना दिसत होते तर ६८५ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

गुंतवणूकदारांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) पतधोरणाच्या निर्णयाकडे लक्ष आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे. येत्या बुधवारी आरबीआयचे पतधोरण विषयक धोरण जाहीर होणार आहे. आरबीआयकडून व्याजदर आणखी ३५ बेस पॉइंट्सने वाढवून ६.२५ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यापूर्वीच गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे.

ओपेक राष्ट्रांनी तेल उत्पादन स्थिर ठेवल्यानंतर सोमवारी तेलाच्या किमती २ टक्क्यांनी वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स २.२ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ८७.४१ डॉलर झाले आहे.

हे ही वाचा :

Back to top button