

गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 63 हजारांच्या उच्चांकी पातळीवर गेल्याची घटना महत्त्वाची ठरते. तसेच निफ्टीनेही 18,758 चा उच्चांक गाठला आहे.
महिंद्र अॅड महिंद्र अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, हिंदुस्थान युनिटीव्हर, भारती एअरटेल, एशियन पेंटस्, टाटा स्टील आणि टायटन या कंपन्यांचे समभाग वरच्या पातळीवर गेले. तर इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, एच सी एल टेक्नॉलॅजीज आणि आयटीसी या कंपन्यांचे समभाग उतरले.
आशियामधील सोल शांघाय व हाँगकाँग येथील शेअरबाजार वरच्या पातळीवर गेले. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर रोज समभाग खरेदी करण्याचे सत्र चालू ठेवले आहे. त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजार वाढण्यावर झाला असावा.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मुक्त व्यापाराला 29 डिसेेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारतातील उत्पादनांना ऑस्ट्रेलियात थेट किंवा विनाशुल्क (ड्युटी फ्री) प्रवेश मिळणार आहे. दोन्ही देशात पुढील 5 वर्षांत 45 अब्ज ते 50 अब्ज डॉलर इतका व्यापार वाढायला वाव आहे.
मुक्त व्यापाराच्या करारामुळे भारतीय निर्यातदारांना सहाहजाराहून अधिक वस्तूंसाठी ऑस्ट्रेलियात शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यात वस्त्रे, चामड्याच्या वस्तू, फर्निचर, दागिने व यंत्रसामग्री यांचा समावेश आहे. ज्या उद्योगक्षेत्रात मानवी श्रम सर्वाधिक लागतात अशा (तयार कपडे, काही कृषी उत्पादने, मत्स्योउत्पादन, पादत्राणे, चामड्याच्या वस्तू, क्रीडा साधने, दागिने, यंत्रे इलेक्ट्रिक उपकरणे इ.) क्षेत्रांना सर्वात जास्त लाभ मिळेल.
सध्या घाऊक व्यवहारासाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपया बाजारात आणल्यानंतर रिटेल व्यवहारासाठीही हे चलन आणण्यात येईल. रिझर्व्ह बँक 1 डिसेंबरपासून हे चलन रिटेल व्यवहारासाठी आणले आहे. पण प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्यात मुंबई, दिल्ली, बंगलोर, भुवनेश्वर या चार शहरांत याची सुरुवात होईल.
एकूण 8 बँका या रिटेल डिजिटल रुपयाचे व्यवस्थापन करतील. या शहरातून होणारे डिजिटल रुपयाचे व्यवहार संभाळण्याची तसेच ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी भारतीय स्टेट बँक, आय. सी. आय. सी. बँक, येस बँक व आय. डी. एफ. सी. फर्स्ट बँक या बँकांकडे देण्यात आली आहे.
दुसर्या टप्यात डिजिटल रुपयाची सुरुवात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा, सिमला या शहरांतून होईल. या व्यवहाराचे व्यवस्थापन बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक व कोटक महिंद्रा बँक या बँका करतील.
डिजिटल रुपया हे रुपयाचे इलेक्ट्रॉनिक रूप आहे. विश्वास, सुरक्षा आणि व्यवहारपूर्तीची क्षमता हे प्रत्यक्ष रोखीचे सर्व गुण डिजिटल रुपयामध्येही पाहायला मिळतात. डिजिटल रुपया बँकांच्या ठेवीमध्ये रूपांतरित करता येईल. हा व्यवहार कागदोपत्रीच होत असल्याने प्रत्यक्ष नाणी वा नोटा याचा त्यात वापर होत नाही. रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेला डिजिटल रुपया ग्रेमचेंजर ठरेल, असे मत स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश खेरा यांनी व्यक्त केले. सध्या हा रुपया प्रायोगिक तत्त्वावर आणला असला तरीही त्याचे कायमस्वरूपी परिणाम दिसतील. या चलनाद्वारे कमी खर्चात जास्त व्यवहार करता येतील. निनावीपणा हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळेच डिजिटल रुपायाला अधिक मान्यता मिळेल. हे चलन सध्याच्या चलनांना पूरक ठरेल. याचाच फायदा आणखी काही नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात येऊ शकतील. सध्या डिजिटल रुपया चारच शहरात उपलब्ध केला असला तरी पुढील टप्प्यात तो आणखी 9 शहरे व 4 बँकांमध्ये उपलब्ध केला जाईल. यावरून भारतही आता विकसनशील देशात वरची पायरी गाठत आहे.
'वस्तू आणि सेवा' कराचे (जीएसटी) नोव्हेंबरमध्ये विक्रमी संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा संकलनात 11 टक्के वाढ झाली आहे. हे संकलन 1.46 लाख कोटी रुपये झाल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. सणवार व उत्त्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात खर्च होतात त्याचा फायदा वस्तू आणि सेरा कराचे संकलन वाढण्यासाठी झाला आहे.
डॉ. वसंत पटवर्धन