Stock Market Updates | परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २८७ ट्रिलियन रुपयांवर! | पुढारी

Stock Market Updates | परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला, सेन्सेक्स, निफ्टीचा नवा उच्चांक, BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २८७ ट्रिलियन रुपयांवर!

Stock Market Updates : शी जिनपिंग यांच्या झीरो कोव्हिड धोरणाविरुद्ध चीनमध्ये लोकांचे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील तीन प्रमुख निर्देशांक घसरले. तर आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण राहिले. पण जगातील घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आलेला नाही. आज मंगळवारी (दि.२९) सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्सने आज ६२,८८१ हा सर्वकालीन उच्चांक गाठला. तर निफ्टीनेही १८,६१८ वर झेप घेतली. आजची सेन्सेक्स आणि निफ्टीची वाढ ही अनुक्रमे १७७ आणि ५५ अंकांची होती. काल सोमवारी देखील दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकी पातळी गाठली होती.

परकीय गुंतवणूकदारांनी स्थानिक शेअर्सची खरेदी सुरू ठेवल्याने आणि कच्च्या तेलात घसरण सुरू राहिल्याने मंगळवारी बीएसई (BSE) वरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल रु. २८७ ट्रिलियनच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. १३ सप्टेंबर रोजी बाजार भांडवल रु. २८६.७१ ट्रिलियन होते. भारतीय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, डाॅलरमध्ये विचार केल्यास गेल्या एका वर्षापासून बाजार भांडवल २.४ टक्क्यांनी वाढून ३.५० ट्रिलियन डॉलरवर (to $3.50 trillion) पोहोचले आहे.

गेल्या एका वर्षात BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल १२ टक्क्यांनी वाढले आहे. सेन्सेक्सने ६२,८७१ चा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे तर निफ्टीने १८,६६२ अंकांच्या विक्रमी उच्चांकावर झेप घेतली आहे. आजपर्यंत, सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही प्रत्येकी सुमारे ७.५ टक्क्यांनी वाढले आहेत.

ऑक्टोबर २०२२ च्या मध्यापासून परदेशी संस्थापक गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी १० टक्क्यांहून अधिक ‍वधारला आहे. आज हिंदाल्को, अपोलो हॉस्पिटल्स, सिप्ला, ब्रिटानिया आणि टायटन हे आज NSE वर सर्वाधिक १.०६ टक्क्यांपर्यंत वाढलेल्या शेअर्समध्ये होते. याउलट बीपीसीएल, एसबीआय लाईफ, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स मागे पडले आहेत. बीएसईवर १,७१० शेअर्स वाढले तर ७१० शेअर्स घसरले.

चीनमध्ये कोविड धोरणाविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशियातील बाजारात संमिश्र राहिले आहे. दक्षिण कोरियाचा KOSPI ०.३५ टक्क्यांनी तर शांघाय कंपोझिट निर्देशांक १.६३ टक्क्यांनी वाढला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ३.४४ टक्क्यांनी वधारला आहे. तर जपानचा निक्केई निर्देशांक ०.५८ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Updates)

काल सोमवारी सेन्सेक्स २११ अंकांनी वाढून ६२,५०४ वर तर निफ्टी ५० अंकांनी वाढून १८,५६२ वर बंद झाला होता. आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button