पिंपरी : पालिका आयुक्त कल्पवृक्षासाठी मसिहा, नारळाच्या वृक्षतोडीस आलेले साडेतीनशेहून अधिक अर्ज फेटाळले | पुढारी

पिंपरी : पालिका आयुक्त कल्पवृक्षासाठी मसिहा, नारळाच्या वृक्षतोडीस आलेले साडेतीनशेहून अधिक अर्ज फेटाळले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीमार्फत वृक्षतोडीच्या प्रकरणांना मोठ्या प्रमाणात मंजुरी दिली जात असतानाच दुसरीकडे महापालिका आयुक्त शेखर सिंह किमान कल्पवृक्ष मानल्या जाणार्‍या नारळाच्या झाडांसाठी मसिहा ठरले आहेत. गेल्या चार महिन्यांत त्यांनी वृक्ष प्राधिकरण समितीकडे नारळाच्या वृक्षतोडीस मान्यतेसाठी आलेले साडेतीनशेहून अधिक अर्ज फेटाळून लावले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पर्यावरणाचे महत्त्व जाणून आजवर 21 लाखांहून अधिक वृक्षारोपण केले आहे. 175 हून अधिक उद्याने विकसित केली आहेत. सन 2007 मध्ये केलेल्या वृक्षगणनेत शहरात 18 लाख 93 हजार झाडे आढळली. त्यानंतर 2018 मध्ये वृक्षगणना सुरू झाली.

त्याचे काम फेब—ुवारी 2022 मध्ये पूर्ण झाले. वृक्षगणनेत 32 लाख वृक्ष आढळून आले. मात्र, कधी रस्ता रुंदीकरणासाठी तर कधी सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागत आहे. महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची सभा दर 45 दिवसांनी होते. शंभरपेक्षा अधिक वृक्षतोडीची प्रकरणे सभेपुढे मान्यतेसाठी असतात, त्यापैकी 70 ते 75 अर्जांना मंजुरी दिली जाते. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समिती ही वृक्षतोड समिती ठरली आहे.

महापालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवट आली. राजेश पाटील यांच्यानंतर महानगरपालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. पर्यावरणप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट म्हणजे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने एक चांगला निर्णय घेतला. नारळाच्या झाडांमुळे मोठे अपघात होत नाहीत. फार तर फक्त नारळाच्या झावळ्या व नारळ खाली पडतात. अशा परिस्थितीत वृक्ष प्राधिकरण समितीकडे नारळाचे झाड तोडण्यासाठी अर्ज आला असता तो फेटाळून लावण्याबाबत आयुक्त सिंह यांनी आदेश दिले. गेल्या चार-पाच बैठकांपासून नारळाचे झाड तोडण्यासाठी आलेली साडेतीनशेहून अधिक प्रकरणे म्हणजेच तितके अर्ज आयुक्त सिंह यांनी फेटाळून लावले आहेत.

विनापरवाना वृक्षतोड करणार्‍यांना जरब बसावी, यासाठी अशा प्रकरणात दोषी व्यक्तीला जागेवरच दंड करण्याचा नाशिक महापालिकेचा प्रस्ताव पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरणानेही अंमलात आणावा; तसेच वृक्षतोडीसाठी अर्ज आल्यावर त्याबाबत प्रत्यक्ष माहिती घेणे, पंचनामा या नेहमीच्या सोपस्काराबरोबरच अशा प्रकरणात त्या धोकादायक झाडांचे छायाचित्र घेऊन मगच तो विषय वृक्ष प्राधिकरणसमोर मांडण्याची ठाणे महापालिकेची पद्धत आणि वृक्षतोड प्रकरणाबाबत वृत्तपत्रात जाहिरात नोटीस देऊन मगच त्यावर निर्णय घेण्याची पुणे महापालिकेची पद्धत पिंपरी चिंचवड महापालिकेने ही अंमलात आणावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

नारळाच्या झाडांमुळे अपघात होत नाहीत; मात्र त्याची फळे (नारळ) व झावळ्या पडतात अशी झाडे खासगी जागेत असतील, तर पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत झावळ्या व नारळ काढून दिले जातात. त्यासाठी प्रतिवृक्ष सहाशे रुपये शुल्क आकारले जाते. नारळाच्या झाडाबाबत दुसर्‍याने तक्रार केली असेल तरी मूळ मालकाची फळे व झावळ्या काढण्यासाठी संमती लागते. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी नारळाची झाडे तोडण्यासाठी आलेल्या अर्जांपैकी सर्वच्या सर्व साडेतीनशे अर्ज फेटाळून लावले आहेत. पर्यावरण रक्षणासाठी पालिका प्रयत्नशील आहे.
– जी. आर.गोसावी,  मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका

Back to top button