अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक; सूसमधील घटना | पुढारी

अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक; सूसमधील घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुटपाथवर बेकायदा व्यवसाय करीत असताना महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने कारवाई करून माल ताब्यात घेतला. त्यात अडथळा आणून मअतिक्रमणफच्या गाडीवर दगडफेक केल्याचा प्रकार सूसमधील शिवशक्ती चौकात घडला.
याप्रकरणी सहायक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रिया बागल (वय 20), राणी बागल (वय 40), बाळू बागल (वय 45, सर्व रा. सूस रोड) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.30) पावणेसहा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काची हे औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सहायक अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाषाण येथील शिवशक्ती चौकात बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत होती. त्या वेळी बागल हे फुटपाथवर फळभाजी घेऊन बसले होते. त्यांचे साहित्य महापालिका कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, श्रीकांत भालेकर, नारायण चव्हाण, प्रशांत कड, विशाल केंदगिरी, लोकेश ढावरे हे जप्त करून ताब्यात घेत होते. त्या वेळी बागल यांनी त्यांना विरोध केला. सरकारी कामात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली. अतिक्रमण विभागाच्या ट्रकवर दगडफेक केली. पोलिस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

Back to top button