नगर: आ. पाचपुते विरोधकांची मोर्चेबांधणी, गावविकासात ‘त्यांचे’ योगदान काय?; कैलास पाचपुतेंचा सवाल | पुढारी

नगर: आ. पाचपुते विरोधकांची मोर्चेबांधणी, गावविकासात ‘त्यांचे’ योगदान काय?; कैलास पाचपुतेंचा सवाल

काष्टी, पुढारी वृत्तसेवा: काष्टी गावचा सर्वागीण विकास व्हावातसेच तरुणांना दिशा मिळवून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमच्या कुटुंबानी पुढाकार घेत जमिनी दिल्याने गावविकास झाला. त्यात सत्ताधार्‍यांचे योगदान काय? असा सवाल करत काष्टी सोसायटीचे अध्यक्ष कैलास पाचपुते यांनी उपस्थित केला. आ. पाचपुते यांच्या पॅनलला शह देण्यासाठी कैलास पाचपुते यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सोसायटीनंतर आता पुन्हा एकदा कैलास पाचपुते- आ. बबनराव पाचपुते आमने-सामने ठकण्याची चिन्हे आहेत.

कैलास पाचपुते, शिवाजीराव बाबासाहेब पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत निवडणूक बैठक झाली. यावेळी आ. पाचपुते यांच्यावर टीका करत तगडे आव्हान उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावाचा आर्थिकदृष्ट्या विकास व्हावा म्हणून स्व.शिवराम अण्णा पाचपुते यांनी स्मशानभूमी, आरोग्य केद्र, शाळा, कॉलेज, जनावरांच्या बाजारसाठी कोट्यावधी रुपयाची जागा विना मोबदला दिली. त्यामुळेच बाजारपेठ बहरली. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर गावातील जागा कमीशन, दलाली खावून विकल्याने गावात बसस्थानक नसल्याचा आरोप कैलास पाचपुते यांनी केला. सार्वजनिक शौचालय नाही, हाच का तुमचा विकास?, इतके वर्षे सत्ता भोगली गावच्या विकासात तुमचे योगदान काय?असा सवाल कैलास पाचपुते यांनी आमदार बबनराव पाचपुते व माजी सभापती अरुण पाचपुते यांचा नामोल्लेख टाळत केला.

दूध संघाचे माजी अध्यक्ष माणिकराव पाचपुते, सहकार महर्षी संस्थेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.विठ्ठलराव काकडे, नागवडे कारखाना संचालक बंडू जगताप काशिनाथ काळे, अनिल शेलार,सर्जेराव पाचपुते, नवनाथ राहिंज, बाळासाहेब संभूदेव पाचपुते, प्रकाश पाचपुते,गुलाबभाई तांबोळी, संजय काळे, अ‍ॅड.निखिल भोसले यावेळी उपस्थित होते.

सोसायटीचे अध्यक्ष राकेश पाचपुते, उपाध्यक्ष शहाजी भोसले, आबासाहेब कोल्हटकर, रमश दांगट, मारुती पाचपुते, चांगदेव पाचपुते, जालिंदर पाचपुते, शरद भोसले यांनी उमेदवारीची मागणी नोंदविली.

अ‍ॅड.विठ्ठलराव काकडे यांनी प्रास्तविक केले. प्रा.सुनिल माने यांनी सूत्रसंचालन तर करण बंडू जगताप यांनी आभार मानले. होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक सर्वाच्या प्रतिष्ठेची आहे. उमेदवारी देताना पंच कमेटीने एकत्र बसुन पैसेवाला किंवा बड्या घरातील चेहरा न देता परिवर्तन घडवून आणणारा चेहरा द्यावा.
– शरद भोसले

चाळीस वर्षापासून आम्ही आमदार पाचपुते यांच्या बरोबर आहे. त्यांचा विकास झाला पण जमिनी विकून आमचे वाटोळे झाले. आमदारांनी सत्तेच्या माध्यमातून गावातील किती तरुणांना नोकर्‍या व रोजगार दिला?, आता सत्ता आपल्याच घरात घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु जनता त्यांना जागा दाखवेल.
– शिवाजीराव पाचपुते

Back to top button