पुणे : ’श्री गणेश अथर्वशीर्ष’वर विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रम | पुढारी

पुणे : ’श्री गणेश अथर्वशीर्ष’वर विद्यापीठात प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मन:शांतीच्या स्थैर्याचा वस्तुपाठ, व्यक्तिमत्व विकासाचा आलेख, स्वयंपूर्णतेचे दिव्य दान आणि सुख, शांती, समाधान व प्रसन्नता यांसह आत्मानंदाची महायात्रा असलेल्या श्री गणेश अथर्वशिर्ष यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. परंतु यावरून वादंग निर्माण झाले आहे.

कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु याला ज्येष्ठ लेखक प्रा.हरी नरके यांनी विरोध केला आहे. प्रा.नरके म्हणाले, विद्यापीठाने अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू करणे हा उलट्या पावलांचा प्रवास आहे. पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठिला धरली जात आहेत.

हे धोकादायक पाऊल आहे. संस्कृतमध्ये अनेक सुंदर आणि मौलिक ग्रंथ आहेत ते शिकवण्याऐवजी अभ्यासकांच्या मते अगदी अलीकडील असलेले अथर्वशीर्ष संस्कृतची गोडी लावणे, मन:शांती व व्यक्तीमत्व विकासासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रमाला लावणे कितपत योग्य आहे. एखाद्या खाजगी संस्थेने काय करावे हा मुद्दा वेगळा आहे. माझा गणेश अथर्वशिर्षाला विरोध नाही.

शासकीय अनुदानावर चालणार्‍या विद्यापीठाने संविधानाच्या कलम 51 चे पालन करण्याऐवजी असे एका धर्माचे लेखन विद्यापीठातर्फे शिकवणे,विद्यापीठाच्या सही शिक्क्याचे प्रमाणपत्र देणे हा निर्णय चुकीचा आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक प्रबोधन यांचा मोठा वारसा आहे. याच न्यायाने उद्या पुढचे पाऊल म्हणून आधुनिक विज्ञानाचे अभ्यासक्रम बंद केले जातील. हे सारे भयंकर आहे.

 

Back to top button