इस्लामपूर भाजी मार्केट, पालिका इमारतीसाठी ७४ कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी | पुढारी

इस्लामपूर भाजी मार्केट, पालिका इमारतीसाठी ७४ कोटींच्या निधीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर शहराच्या लौकीकात भर घालणाऱ्या महत्वाकांक्षी भाजी मार्केट व नगरपालिका नवीन इमारत बांधकामासाठी ७४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटींचा निधीही मंजूर केला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी दिली. शहराच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी एवढा मोठा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

आनंदराव पवार म्हणाले, भाजी मार्केट व शॉपिंग सेंटरसाठी अंदाजीत खर्च ५२ कोटी रुपये आहे. पहिल्या टप्यात १५ कोटी रुयये मंजूर झाले आहेत. २.५३ हजार चौरस फूट पाच मजली भाजी, फळे, फुले मार्केट, बहुउद्देशीय हॉल, नाटयगृह व सिनेमागृह, पार्किंग असा हा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प शहराच्या विकासात भर घालणारा आहे.

तर पालिकेची प्रस्तावित इमारत अंदाजे ६० हजार चौरस फूट क्षेत्रफळाची आहे. या चार मजली इमारतीत पार्किंग, प्रशासकीय इमारत, सभागृह विविध पदाधिका-यांची दालने असणार आहेत. यासाठी २२ कोटींचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ५ कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. याआधी रस्ते व गटारींसाठी ११ कोटी तसेच विविध विकास कामांसाठी १.७० कोटी व खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून ३.४० कोटी इतका निधी आणलेला आहे. नगर पालिका इमारत व बाजार माळ इमारतीचे लवकरच उद्घाटन होवून प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button