Thackeray-Yadav meet : आदित्य ठाकरेंनी पाटण्यात घेतली बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट | पुढारी

Thackeray-Yadav meet : आदित्य ठाकरेंनी पाटण्यात घेतली बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Thackeray-Yadav meet )  यांनी आज (दि. २३) बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. राबडी निवासस्थानी तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. तेजस्वी यादव यांनी ठाकरे यांना लालूप्रसाद यादव यांच्या चरित्रावर लिहिलेले पुस्तक भेट दिले. या वेळी शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, अनिल देसाई उपस्थित होते.

आदित्य ठाकरे आज दुपारी पाटण्यात (Thackeray-Yadav meet  ) पोहोचले. त्यानंतर ते तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी त्यांची आई, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी गेले. यावेळी तेजस्वी यांनी आदित्य ठाकरे यांना शाल आणि लालू यादव यांचे पुस्तक भेट दिले. यावेळी बराच वेळ दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर दोघेही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीसाठी निघाले.

पाटण्यात पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी पहिल्यांदाच पाटणा येथे आलो आहे. उपमुख्यमंत्री यादव यांच्या स्वागताने भारावून गेलो आहे. आमचे वयही जवळपास समान असल्यामुळे तेजस्वी यादव यांच्यासोबत चांगली मैत्री निर्माण होईल, असे ठाकरे म्हणाले. देशाच्या प्रश्‍नांबाबत आमचेही समान विचार असल्याचेही त्‍यांनी या वेळी नमूद केले.

Thackeray-Yadav meet : मुंबई मनपा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे- यादव यांची भेट महत्त्वाची मानली जाते. तीन दशकांपासून महापालिकेच्या सत्तेत असलेल्या आणि बंडखोरी झालेल्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरू शकते. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे गटाला ही लढाई स्वबळावर लढावी लागणार आहे.

बीएमसी निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार खूप महत्त्वाचे मानले जातात. निवडणुकीपूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष उत्तर भारतीय मतदारांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. या दोन्ही नेत्यांमधील मंगळवारी झालेल्या भेटीकडे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button