चोर चोरीसाठी घरात शिरला; अन् कॉफी पिऊन चक्‍क डाराडूर झोपी गेला, सकाळी… | पुढारी

चोर चोरीसाठी घरात शिरला; अन् कॉफी पिऊन चक्‍क डाराडूर झोपी गेला, सकाळी...

वॉशिंग्टन : अमेरिकेत एक विचित्र घटना घडली आहे. तिथे एक चोर चोरी करण्यासाठी एका घरात गेला खरा; पण कॉफी पिऊन चक्क डाराडूर झोपी गेला. ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधील आहे. या चोराचं नाव मर्डोक असून तो 29 वर्षांचा आहे.

घटनेच्या दिवशी मर्डोक चोरी करण्यासाठी एका घरात घुसला. जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा फ्लोअरवर कोणीही नव्हतं. त्यानंतर त्याने बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि किचनमध्ये कॉफी प्यायला. त्यानंतर त्याला झोप आली आणि तो बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला. झोप पूर्ण झाल्यानंतर काहीही न चोरता निघून गेला. घराचा मालक आल्यानंतर त्याला चोर घुसल्याचा संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. फ्लोरिडा पोलिसांनी सांगितलं की, चोराने घरात घुसण्यासाठी दरवाजा जवळील काच तोडली होती.

त्यानंतर बाथरूमध्ये बाथटब वापरला आणि बेडरूममध्ये जाऊन मस्त झोपला! पोलिसांनी मालकाच्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद केली आणि तपासाची चक्र फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोराला अटक केली. पोलिसांनी त्याच्यावर चोरी आणि मालमत्तेचं नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच चोराने त्या दिवशी काय केले याची कबुली देखील दिली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Back to top button