जंक्शन : द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना रस्त्यांच्या कामामुळे लाभ : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

जंक्शन : द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना रस्त्यांच्या कामामुळे लाभ : खासदार सुप्रिया सुळे

जंक्शन; पुढारी वृत्तसेवा : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. बोरी गावासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना झालेल्या रस्त्याच्या फायद्याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. बोरी (ता. इंदापूर) येथे ‘आपला मतदारसंघ,आपला अभिमान‘ या अभियानांतर्गत गुरुवारी (दि. 17) येथील सुभाष शिंदे, मल्हारी शिंदे यांच्या द्राक्ष शेती, शेततळ्याची पाहणी करीत असताना खा. सुळे शेतकर्‍यांसोबत बोलत होत्या.

या वेळी शेतकर्‍यांनी सांगितले, की माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यामुळे बोरी गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. पूर्वी डांबरी रस्ते नसल्यामुळे द्राक्षांच्या घडावर रस्त्यावरील धूळ बसत होती. यामुळे रस्त्याच्या कडेच्या बागेतील द्राक्ष निर्यातीबाबत अडचणी येत होत्या.

रस्त्याची कामे झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत नाही. दर्जेदार द्राक्षे मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. या वेळी खा. सुळे यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करताना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे कौतुक करून रस्ते व विजेचा फायदा शेतकर्‍यांना कसा प्रकारे झाला, याची माहिती संसदेमध्ये देणार असल्याचे सांगितले.

या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील सोनाई दूध व नेचर डिलाईट दूध प्रकल्पाचे कौतुक करून तालुक्यात मोठे दूध प्रकल्प असून, शेतकर्‍यांचा फायदा होत असल्याचे सांगितले. या वेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष भारत शिंदे, श्री छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अशोक पाटील, बोरीचे माजी सरपंच संदीप शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुंमत कोकाटे, सचिन सपकळ आदी उपस्थित होते.

Back to top button