चर्चा तर होणारच! चंद्रपुरात कुत्रीच्या पिल्‍लाचा नामकरण सोहळा; गावात उत्‍साह, महिलांकडून पालणपोषणाची जबाबदारी | पुढारी

चर्चा तर होणारच! चंद्रपुरात कुत्रीच्या पिल्‍लाचा नामकरण सोहळा; गावात उत्‍साह, महिलांकडून पालणपोषणाची जबाबदारी

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : घरी बाळ जन्मास आल्‍यावर मोठ्या उत्साहात रितीरिवाजानुसार त्यांचा नामकरण विधी केला जातो. पाहुण्यांचे आगमन होते, नातेवाईकांची चहलपहल असते. भोजनाची व्यवस्‍था केली जाते. बाळाला पाळण्यात घालून पाळणा गीत गायले जाते. त्यांनतर बाळाचे नामकरण करून हा विधी संपन्न होत असतो. वर्षांनुवर्षे हा रितीरिवाज सुरू आहे. पण हे सर्व एखाद्या पाळीव प्राण्याचा नामकरण विधीसाठी पार पडले आहे असे ऐकले तर आपला विश्वास बसणार का? अजिबात नाही. पण होय चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही गावात नुकत्याच जन्मास आलेल्या कुत्रीच्या पिल्लाचा नामकरण विधी बुधवारी (16 नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात पार पडला. एखाद्या बाळाचा नामकरण विधी व्हावा असाच कार्यक्रम पाळीव कुत्रीच्या पिल्लाचा पार पडला. दत्तात्रय असे नाव ठेवलेल्या पिल्लांच्या पालनपोषणाची जबाबदारी किन्ही गावातीलच अनुसया यादव सहारे या महिलेने घेतली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील किन्ही एक छोटेशे गाव आहे. याच गावात मागील पाच सहा वर्षांपासून अनुसया नावाची कुत्री गावातील एका मोहल्यात राहते. मोहल्लयातील अनेकांच्या घरातून तिला पीठ भाकरी, अन्न खाऊ घातले जात असल्याने ती याच ठिकाणी नियमितपणे राहू लागली होती. त्‍यामुळे अनेक कुटूंबांना तीचा लळा लागला होता. स्वभावाने शांत असलेल्या अनुसया कुत्रीचा स्वभाव मोहल्यातील नागरिकांना चांगलाच भावला होता. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटी पिल्लू जन्मास आले. मोहल्‍ल्‍यात ती सर्वांच्या लाडाची असल्‍याने या पिल्लाचा नामकरण विधी करण्याची कल्पना गावातीलच रविंद्र प्रधान यांना आली. त्यांनी स्वत:च्या खर्चातूनच नामरण विधी करण्याकरीता खर्च उचलण्याची तयार दर्शविली.

त्यांनी, मनोज सहारे यांच्या पुढाकारातून पिल्लूचा नामकरण विधी हिंदू संस्कृतीनुसार करण्याचे ठरविले. त्याकरीता सर्व तयारी करून (बुधवार) नामकरण विधी आयोजित करण्यात आला. हनुमान मंदिर परिसरात नामकरण विधीचे आयोजन करण्यात आले. नामकरण विधीला गावातील पाहूणे बोलविण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थित लक्षणीय होती. पाळणा गाणाऱ्या महिलांनाही बोलविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बारशाला सुरूवात झाली. पिल्लाला पाळण्यात टाकण्यात आले. महिलांनी पाळणा पकडला. पाळण्यात पिल्लाला घालून गायन करण्यात आले. अनुसया यादव सहारे नामक महिलेने पिल्लाची पालनपोषणाची जबाबदारी घेतली आहे.

एखाद्या कुत्रीच्या पिल्लाचा नामकरण सोहळा अशा प्रकारे येथील नागरिकांसाठीही पहिल्यांदाच होता. त्यामुळेच या अनोख्या नामकरण कार्यक्रमाची चर्चा पंचक्रोशीत पहता पहाता पसरली. सगळ्यांच्या तोंडी नामकरणाची चर्चा ऐकायला मिळाली. नामकरण विधी कार्यक्रम पाहण्यासाठी बऱ्याच लोकांची गर्दी केली होती. गावातील अनुसया यादव सहारे, रंजना रवींद्र प्रधान, विमल जनार्दन धोटे, शेवंता लक्ष्मण सदाफळे, विमल मनचंद्र भागडकर, पार्वता टोलीराम भरै, साधना मनोज सहारे, रवींद्र प्रधान, यादव सहारे किसन राऊत, भगवान बगमारे, सुधाकर भर्रे, मनोज सहारे दिनेश दोनाडकर नामकरण यांनी हा विधी पार पाडण्यासाठी संपूर्ण जबाबदारी सांभाळली.

हेही वाचा :  

Back to top button