गुजरात विधानसभा निवडणूक वार्तापत्र : राहुल गांधी यांच्या प्रचारातील प्रवेशाने काँग्रेसमध्ये नवचैतन्य | पुढारी

गुजरात विधानसभा निवडणूक वार्तापत्र : राहुल गांधी यांच्या प्रचारातील प्रवेशाने काँग्रेसमध्ये नवचैतन्य

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होणार असून सत्तारूढ भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या प्रचाराला जोर चढू लागला आहे. हा मुकाबला त्रिकोणी होणार असल्याने कोणता पक्ष बाजी मारणार, याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. 8 डिसेंबर रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून, त्याच दिवशी सारे चित्र स्पष्ट होईल.

होय, नाही म्हणत अखेर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून सवड काढत गुजरातच्या निवडणूक प्रचारात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गुजरात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अर्थातच उत्साह संचारला नसल्यास नवल ते कसले. गेल्या म्हणजे 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राहुल यांनी जोरदार प्रचार करीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यावेळसारखा धुवाँधार प्रचार यावेळी पाहावयास मिळणार नसला तरी राहुल यांनी प्रचारात उडी घेणे हीच काँग्रेस पक्षासाठी समाधानाची बाब आहे. गतवेळच्या तुलनेत काँगे्रसने यावेळी आपले प्रचाराचे तंत्र बदलले आहे. धडाकेबाज प्रचार करण्याऐवजी गावा-गावांत जाऊन जनतेशी संवाद साधण्याचे काम काँग्रेस कार्यकर्ते करीत आहेत. अर्थात, हेच धोरण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अवलंबल्याचे दिसत आहे.

काँग्रेस पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेचे आयोजन केले आहे. सध्या या यात्रेचा निम्मा प्रवास पूर्ण झाला आहे. यात्रेचे कारण देत राहुल यांनी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे पाठ फिरवली होती. तथापि, गुजरातचा विषय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच राहुल यांनी गुजरातमध्ये येऊन प्रचार करावा, यासाठीचा दबाव वाढला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते गृहराज्य असल्यामुळे राहुल यांनी प्रचाराकडे पाठ फिरवू नये, असे काँग्रेसमधील धुरिणांचे म्हणणे होते. त्यांच्या या आग्रहाला मान देऊन राहुल येत्या 22 तारखेपासून प्रचारात उडी घेणार आहेत. गुजरातच्या सौराष्ट्र भागात काँग्रेसचा पाया मजबूत आहे. त्यामुळे सर्वप्रथम राहुल हे सौराष्ट्रचा दौरा करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचारानंतर ते दुसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी दोन रॅली काढणार आहेत.

गुजरातमध्ये भाजपच्या तुलनेत काँग्रेस कमकुवत वाटत असली तरी पक्षाने प्रचारात सगळी ताकद ओतल्याचे दिसून येते. त्यादृष्टीने मुकुल वासनिक यांच्याकडे गुजरातच्या दक्षिण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मोहन प्रकाश यांच्याकडे सौराष्ट्र विभागाची, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्य विभागाची, तर बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे उर्वरित विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.स्थानिक नेते जिग्नेश मेवानी हे राज्याच्या विविध भागांत प्रचारसभा घेत आहेत. वडगा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या मेवानी यांची लढत यावेळी भाजपच्या मणिभाई वाघेला यांच्याशी होत आहे. गेल्या निवडणुकीत मेवानी यांनी वडगामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. राज्यातील प्रमुख दलित नेते असलेल्या मेवानी यांची घोडदौड रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
गुजरातच्या निवडणुकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष लक्ष आहे.

आम आदमी पक्षाला आम्ही हलक्यात घेणार नाही. तथापि, त्यांचे राज्यात खाते उघडले जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे शहा यांनी सांगितले आहे. दिल्ली आणि पंजाबचा अनुभव लक्षात घेता भाजप आम आदमी पक्षाला नक्कीच हलक्यात घेणार नाही. एकीकडे प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे सुरत पूर्व मतदारसंघाचे उमेदवार कांचन जरीवाला यांचे भाजपने अपहरण केल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. भाजपच्या दबावामुळे जरीवाला यांनी उमेदवारी मागे घेतली, असा आपचा दावा आहे. या प्रकरणातील सत्य-असत्य लवकरच बाहेर येईल. मात्र, आपच्या या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे यात शंका नाही.

– पार्थ ठाकूर 

 

Back to top button