बचतगटांमुळे मोदींचे स्वप्न पूर्ण होऊ शकते : अमृता फडणवीस | पुढारी

बचतगटांमुळे मोदींचे स्वप्न पूर्ण होऊ शकते : अमृता फडणवीस

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  बचत गटासारख्या चळवळीतून प्रत्येक गावाने आर्थिक विकासात योगदान दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले 5 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होण्यास वेगळ लागणार नाही, पण यासाठी कष्ट, सुंदर उत्पादन, ट्रेनिंग घेवून चांगले मार्केटींग असा प्रवास तुम्हाला करावा लागेल. बचतगटांचा हा यशस्वी प्रवास पाहण्यासाठी ‘मी पुन्हा येईन’ असा आशावाद व्यक्त करुन सौ.अमृता फडणवीस यांनी उपस्थित महिलांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला.

जनसेवा फौंडेशन आणि राहाता पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटांचा मेळावा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. लोणी परिसरात येताच फडणवीस यांनी प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीयमंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जावून पुष्पचक्र अर्पण केले. याप्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वासराव कडू यांच्यासह सर्व संचालक आधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी अकोले नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपविभागीय कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, प्रभारी गटविकास आधिकारी सुर्यवंशी, तालुका कृषि आधिकारी बापूसाहेब शिंदे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी लिलावती सरोदे, जनसेवा फौंडेशनचे सचिव डॉ. हरिभाऊ आहेर, लोणी बुद्रूकच्या सरपंच श्रीमती कल्पना मैड, प्रभावती खालकर, प्रकल्प संचालिका रुपाली लोंढे यांच्यासह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी महिलांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाल्या की, समाजातील प्रत्येक महिला ही पुजनिय आहे, तिच्यामध्ये एक सकारात्मक उर्जाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आपल्या स्वकर्तृत्वाने पुढे जात आहेत. ‘बेटी बचाव बेटी पढाव पेक्षा आता ‘बेटी को आगे बढाओ, घर पे मत बिठाओ’ असा संदेश घेवून पुढे जावे लागणार आहे. यातूनच नवा आत्मविश्वास निर्माण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शालिनीताई विखे यांनी जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची माहीती आपल्या भाषणातून देतानाच फडणवीस यांच्या सारख्या बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तितत्व आपल्या महिलांशी संवाद साधण्यासाठी आल्या याचा मला खुप अभिमान असल्याचे नमुद केले.

Back to top button