पिंपरी: न्यूमोनियाची रुग्णसंख्या घटली, कोरोना काळात वाढला होता रुग्णसंख्येचा आकडा | पुढारी

पिंपरी: न्यूमोनियाची रुग्णसंख्या घटली, कोरोना काळात वाढला होता रुग्णसंख्येचा आकडा

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरात सध्या न्यूमोनियाची साथ नियंत्रणात आली आहे. कोरोनाच्या काळात गतवर्षी रुग्णालयांमध्ये दररोज 15 ते 20 न्यूमोनियाचे रुग्ण आढळत होते. तर, सध्या हे प्रमाण केवळ दररोज 2 ते 3 रुग्णांवर आले आहे. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांतील ही स्थिती आहे. कोरोना काळात वाढली रुग्ण शहरामध्ये कोरोना काळात म्हणजे 2021 मध्ये एका खासगी रुग्णालयात न्यूमोनियाचे दररोज 15 ते 20 रुग्ण आढळत होते. त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारी रुग्णालयांमध्ये त्याची संख्या वाढली होती.

मात्र, सध्या हे चित्र बरेच बदलले आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात न्यूमोनियाचे दिवसाला सरासरी 15 ते 20 रुग्ण आढळत होते. तर, सध्या दिवसाला केवळ 2 ते 3 रुग्ण आढळत आहेत. याबाबत काही खासगी रुग्णालयांमध्ये विचारणा केली असता त्यांच्याकडे एक ते दीड महिन्यापूर्वी दिवसाला 5 ते 6 न्यूमोनियाचे रुग्ण आढळत होते. सध्या दिवसाला केवळ 1 ते 2 रुग्ण आढळत आहे.

वातावरणातील बदल कारणीभूत

न्यूमोनियाची सुरुवात सर्दी, खोकल्यापासून होते. या आजाराचे लवकर निदान झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळविता येऊ शकते. वातावरणातील बदल म्हणजेच पावसाळा, थंडीचे वातावरण हे प्रामुख्याने या आजारास कारणीभूत ठरते.

प्रमुख लक्षणे: सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, छाती दुखणे, दम लागणे.

काय काळजी घ्याल ?

ताप, खोकला, दम लागत असल्यास रुग्णाला तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
एक्स-रे, सिटी स्कॅन आणि सीबीसी चाचणी (पांढर्‍या पेशींची चाचणी) करून घ्यावी.
सकाळी थंड हवेत फिरणे टाळावे.
अतिथंड पदार्थ वर्ज्य करावे.
गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Back to top button