नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी | पुढारी

नाशिक : प्रवाशांच्या गर्दीत चोरट्यांची वर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी कायम असून, त्याचा फायदा चोरटेही उचलत आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांत दोन घटनांमध्ये चोरट्यांनी प्रवाशांकडील रोकड व दागिने चोरून नेल्याच्या घटना जुने सीबीएस व द्वारका स्थानकात घडल्या आहेत. या प्रकरणी सरकारवाडा व भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत चैताली किरण मोहिते (रा. पवननगर, सिडको) या शुक्रवारी (दि. 4) सकाळी 11च्या सुमारास जुने सीबीएस येथून त्र्यंबकला जाण्यासाठी बसमध्ये बसत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने चैताली यांच्या पर्समधील 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत सुशीला दौलतराव थेटे (62, रा. पालखेड, ता. निफाड) या सोमवारी (दि. 7) दुपारी 1 वाजता द्वारका सर्कल येथे बसची वाट पाहत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्याने सुशीला यांच्या पर्समधील 15 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधीही दिवाळीदरम्यान, चोरट्यांनी प्रवाशांकडील रोकड, सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. त्यातील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. चोरट्यांचा बंदोबस्त न केल्याने प्रवाशांच्या आनंदावर विरजण पडत असून, चोरट्यांनी विशेषत: महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष केल्याचे दिसत आहे.

साध्या वेशात पोलिसांचा ‘वॉच’…
मुंबई नाका बसस्थानकात सलग तीन ते चार चोरीच्या घटना घडल्यानंतर तेथे साध्या वेशात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, ही बाब चोरट्यांच्या लक्षात आल्याचे बोलले जात असून, त्यामुळे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा जुने सीबीएस व इतर बसस्थानकांकडे वळवल्याची चर्चा आहे.

हेही वाचा:

Back to top button