सांगली : पलूस तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच; थेट जनतेतून सरपंच पदामुळे निवडणुकीत चुरस | पुढारी

सांगली : पलूस तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच; थेट जनतेतून सरपंच पदामुळे निवडणुकीत चुरस

पलूस (सांगली), पुढारी वृत्‍तसेवा : सांगली जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामूळे सध्या गावात ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत सदस्यासह सरपंच पद थेट जनतेतून असल्यामुळे निवडणुकीत चुरस पाहायला मिळेल.

ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजित कदम, भाजपचे नेते पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख व राष्ट्रवादीचे नेते आमदार अरुण लाड यांचा तालुक्यात संपर्क वाढला असून आहे. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकासाठी काँग्रेस व भाजप हे दोन पक्ष तुल्यबळ आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने येथे नव्याने पक्ष बांधणी करीत चांगलीच मोठी बांधली आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता येईल, यासाठी माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जोरदार ताकद लावली आहे. गेल्या सहा महिन्यापासून तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांचा धडाका त्यांनी लावला आहे. गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तर ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप व राष्ट्रवादीमधील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सुरु केला आहे. काँग्रेस तालुक्यात नंबर वन कसा राहील यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन आता भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजप आता ड्रायव्हिंग सीटवर येण्याची जोरदार तयारी करीत आहे; तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांचा धडाका लावला आहे. तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आपला जनसंपर्क वाढवला असून, निवडणुकीचीच तयारी सुरू केली आहे.

राज्यात असलेल्या शिंदे – फडणवीस सरकारचा फायदा घेत भाजपमधील नेत्यांनी आता तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवरही कमळ कसे फुलेल यासाठी प्रयत्न चालवले आहेत. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसही तालुक्यात नव्याने हातपाय पसरू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार अरुण लाड व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड यांनी तालुक्यात नव्याने राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे. भाजप व काँग्रेसमधील नाराज मंडळींनी आपल्या हातात घड्याळ बांधले असून शरद लाड यांनी तालुक्यात जुळवाजुळव सुरू केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी तालुक्यात चांगलीच मूळ धरू लागली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण लाड व शरद लाड यांनी तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी दिलेला आहे.तसेच विविध कार्यक्रमांना सुद्धा ते आवर्जून हजेरी लावत आहेत.

आमदार अरुण लाड फंडातून विविध विकासकामांनाही त्यांनी निधी देत तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या पक्षाची ताकद कमी असली तरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी आपली ताकद पणाला लावेल; असे चित्र पाहायला मिळत आहे.

या गावात होणार निवडणुका –

बुर्ली, खटाव ,सावंतपूर ,ब्रम्हनाळ ,पुनदीवाडी , सांडगेवाडी ,सुखवाडी ,बांबवडे ,चोपडेवाडी ,पुणदी तर्फ वाळवा,वसगडे , हजारवाडी ,दुधोंडी, घोगांव, कुंडल,अंकलखोप या गावांत निवडणुका होणार आहेत.

हेही वाचा  

खा. राहुल गांधी यांच्याकडून आ. सतेज पाटील यांच्या ‘एलईडी स्क्रीन रथ’ चे कौतुक

अखेर संजय राऊत मीडियासमोर आले, कुणावरही टीका नाही, फडणवीसांच्या निर्णयाचे केले कौतुक

कोल्हापूर : माती काम करताना विजेच्या धक्क्याने खुपीरेत तरुणाचा मृत्यू

Back to top button