भोसरीच्या कुस्ती संकुलात घडणार आंतरराष्ट्रीय मल्ल | पुढारी

भोसरीच्या कुस्ती संकुलात घडणार आंतरराष्ट्रीय मल्ल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड महापालिकेचा भोसरी येथील मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल कांदिवली, मुंबई येथील नरसिंग रेसलिंग अ‍ॅकॅडमीस दहा वर्षे कराराने चालविण्यास देण्यात येणार आहे. या केंद्रातून आंतरराष्ट्रीय दजार्च खेळाडू तयार होतील, असा दावा पालिकेने केला आहे. ती अ‍ॅकॅडमी ऑलिम्पियन व ट्रीपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव यांची आहे. पालिकेने भोसरीतील गाव जत्रा मैदानाशेजारी हे संकुल उभारले आहे. त्याचे उद्घाटन होऊन आठ महिने झाले. शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण मिळावे, म्हणून संकुल नामांकित कुस्ती प्रशिक्षकास चालविण्यास देण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला होता. त्याबाबत त्यांनी पुणे जिल्ह्यातील अनुभवी व पुरस्कार पात्र खेळाडू, प्रशिक्षक, केंद्रचालक व वस्ताद, तज्ज्ञ आदींची बैठक घेतली होती. त्यानुसार, ऑलिम्पिक खेळाडू नरसिंग यादव यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यांच्या अ‍ॅकॅडमीतून आतापर्यंत 14 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहे.

पालिकेच्या क्रीडा विभाग नरसिंग अ‍ॅकॅडमीसोबत कुस्ती प्रशिक्षणासाठी 10 वर्षांचा करार करणार आहे. क्रीडा विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.9) स्थायी समितीची मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अ‍ॅकॅडमीसोबत करारनामा केला जाणार आहे. त्यानंतर खेळाडूंची निवड चाचणी घेऊन प्रशिक्षणास सुरुवात केली जाईल.

पालिका संकुलासाठी वीज, पाणी, स्वच्छता, सुरक्षा पुरविणार
कुस्ती प्रशिक्षणासाठी पालिका वीज, पाणी, स्वच्छता व सुरक्षेची जबाबदारी उचलणार आहे. अ‍ॅकॅडमीने 100 खेळाडूंना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यातील 40 खेळाडू पिंपरी-चिंचवड शहरातील असतील, त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची अट आहे. उर्वरित 60 खेळाडूंकडून अ‍ॅकॅडमीस शुल्क आकारता येणार आहे. तसेच, अ‍ॅकॅडमीस पुरस्कर्त्यांकडून आर्थिक सहाय घेता येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाईल. त्यातील शहरातील 30 खेळाडूंना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षण, आहार, निवास, समुपदेशक, वैद्यकीय सुविधा आणि इतर बाबीसाठी अ‍ॅकॅडमी खर्च करणार आहे.

Back to top button