Oscar Fernandes : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन | पुढारी

Oscar Fernandes : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस यांचे निधन

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : माजी केंद्रीय मंत्री, राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मंगळूर येथील रुग्णालयात फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, फर्नांडिस (Oscar Fernandes) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षाचे होते.

फर्नांडिस यांचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. ते यूपीए सरकारमध्ये रस्ते वाहतूक मंत्री होते. त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले होते.

५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत केंद्रीय मंत्री आणि अनेकवेळा खासदार म्हणून ते निवडून आले.

१९८० मध्ये ते कर्नाटकमधील उडप्पी मधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ पर्यंत ते सलग निवडून आले. १९९८ मध्ये काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले.

जुलै महिन्यात घरात योगा करत असताना तोल जाऊन पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ऑस्कर फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल काँग्रेसने दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी केलेले मार्गदर्शन नेहमीच आमच्या स्मरणात राहील, असे काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयानेही फर्नांडिस यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे ट्विट पीएमओंकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button