Team India : टीम इंडियाची ‘अनलकी’ अंपायरपासून सुटका! फायनलमध्ये एन्ट्री पक्कीच म्हणून समजा | पुढारी

Team India : टीम इंडियाची ‘अनलकी’ अंपायरपासून सुटका! फायनलमध्ये एन्ट्री पक्कीच म्हणून समजा

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आता फक्त 3 सामने शिल्लक राहिले आहेत. यातील पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना पाकिस्तानशी होईल, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना भारताशी होईल. या सामन्यांसाठीच्या पंच आणि सामनाधिका-यांच्या नावाची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी केली. या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आनंद साजरा केला आहे. याला कारण म्हणजे रिचर्ड कॅटलबरो नावाचे पंच भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीच्या दुस-या सामन्यात अंपायरींग करणार नाहीत. कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल हे अॅडलेड येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात मैदानी पंचांची भूमिका बजावतील. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. सामन्यासाठी ख्रिस गॅफनी हे तिसरे पंच असतील. दरम्यान, रिचर्ड कॅटलबरो हे भारताच्या सामन्यादरम्यान पंच नसणे दिलासादायक बाब असल्याचे अनेक चाहत्यांचे म्हणणे आहे. अनेकांनी तर ते भारतासाठी अनलकी असल्याचे म्हटले आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण….

कॅटलरबरो भारतासाठी अनलकी का आहेत?

रिचर्ड कॅटलबरो हे टीम इंडियासाठी फारच अनलकी ठरले आहेत. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमधील भारताच्या सर्व बाद फेरीत त्यांनी पंच म्हणून काम केले आहे आणि दुर्दैवाने त्या सामन्यांत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागाला आहे. यात भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 वर्ल्ड कप फायनल (2014), भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल (2015), भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनल (2016), भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (2017), भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल (2019), याशिवाय भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल या महत्त्वाच्या सामन्यांचा समावेश आहे. या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे आणि त्या सामन्यात सिचर्ड कॅटलबरो हे अंपायर होते.

कॅटलबरो आल्यावर भारतात काय होईल?

2014 टी-20 विश्वचषक फायनलमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 130 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 13 चेंडू राखून सामना जिंकून विश्वचषकावर पहिल्यांदा नाव कोरले होते. पुढच्याच वर्षी 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 7 विकेट गमावून 328 धावा केल्या, परंतु भारतीय डाव अवघ्या 233 धावांवर आटोपला आणि सामना 95 धावांनी गमावला. स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 2016 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान भारतावर वेस्ट इंडिजने मात केली. त्या सामन्यात रिचर्ड कॅटलबरो हे पंच होते. 192 धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने शेवटच्या षटकात 7 गडी राखून रोमांचक विजय नोंदवला होता.

2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने धडक मारली होती. पण टीम इंडियाने निराशा केली. विजेतेपदाच्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 बाद 338 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर 50 षटकांच्या या सामन्यात विराट सेना 31व्या षटकातच 158 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाचा त्या सामन्यात 180 धावांनी दारुण पराभव झाला. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाला तेव्हाही रिचर्ड केटलबरो हे मैदानी पंच होते. कॅटलबरो हे 2021 मध्ये इंग्लंडमधील टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीव्ही पंच होते. तो सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला होता आणि त्यातही किवीच्या संघाने विराट सेनेला मात दिली होती.

Back to top button