ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला; भाजप, शिंदे गट आक्रमक होणार | पुढारी

ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला; भाजप, शिंदे गट आक्रमक होणार

मुंबई; दिलीप सपाटे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून दिलेला हादरा आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सहज विजय मिळवून पहिली लढाई जिंकली आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी सुमारे 65 हजार मतांनी सहज विजय मिळविला.

नवीन चिन्ह घेऊन लढलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा विजय महापालिका निवडणुकीपूर्वी आत्मविश्वास वाढविणारा ठरला. भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटासाठी मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुकीत आणखी तयारी करावी लागणार, हे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गट येत्या काळात आक्रमक झालेले दिसतील.

भाजप आणि शिंदे गटाने ही निवडणूक सुरुवातीला अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारसंघातील परिस्थिती पाहून भाजपने महापालिका निवडणुकीपूर्वी नकारात्मक राजकारणाला फाटा देत आपला उमेदवार मागे घेतला. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत संपली होती.

हा विजय उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारा तर आहेच; पण सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वास वाढविणाराही ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आले. मशाल चिन्ह घेऊन ऋतुजा लटके यांना मैदानात उतरावे लागले. हे चिन्ह मतदार स्वीकारतात का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, उद्धव ठाकरे यांची शिवसेना मशाल चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरली. रमेश लटके यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 62 हजार 773 मते मिळाली होती. यावेळी ऋतुजा लटके या 66 हजार 530 मते मिळवून विजयी झाल्या. 2014 ला रमेश लटके यांना 52 हजार 817 मते मिळाली होती. त्यामुळे नवीन चिन्ह असतानाही ऋतुजा लटके यांना आधीच्या दोन्ही निवडणुकीपेक्षा जादा मते मिळाली आहेत. त्यामुळे चिन्ह गोठविल्याचा कोणताही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतावर झाला नाही. उलट 31.75 टक्के एवढे कमी मतदान होऊनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली मते अबाधित ठेवताना त्यात भर घातली आहे.

यावेळी भाजपने ऋतुजा लटके यांना असलेली सहानुभूती ओळखून मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लटके यांना ही निवडणूक सोपी गेली असली तरी या निवडणुकीत शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताबरोबरच दलित, मुस्लिम मतांचाही फायदा झाला आहे. राज्यातील सत्ता शिवसेनेकडून हिसकावून घेतल्यानंतर भाजपचे पुढचे मिशन हे मुंबई महापालिकाच आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिकेची सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपने आतापासून सर्व शक्ती पणाला लावली आहे. मतदारांचा नकारात्मक प्रतिसाद दूर करायचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.

Back to top button