बारामती उपविभागात 901 हेक्टरचे उद्दिष्ट; फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन | पुढारी

बारामती उपविभागात 901 हेक्टरचे उद्दिष्ट; फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बारामती; पुढारी वृत्तसेवा: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन 2022-23 अंतर्गत शेतकर्‍यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बारामती उपविभागात फळबाग लागवड योजनेसाठी 901 हेक्टर फळपिके लागवडीचे उद्दिष्ट आहे. ऑक्टोबरअखेर 1 हजार 410 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना प्रशासकीय मान्यता व 1 हजार 424 हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांना तांत्रिक मंजुरी मिळाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सलग क्षेत्रावर फळबाग व बांधावर फळझाडे लागवडीसाठी इच्छुक शेतकर्‍यांनी संबंधित गावातील कृषी सहायकाकडे अर्ज करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. अशी आहे योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, लिंबू, संत्रा, मोसंबी, सीताफळ, नारळ, आवळा, अंजीर, जांभूळ, चिंच, फणस, शेवगा, काजू, ड्रॅगनफ—ुट, अ‍ॅव्हाकॅडो, केळी व द्राक्ष या पिकांचा समावेश आहे. गुलाब, मोगरा व निशिगंध या फुलपिकांच्या लागवडीसाठीसुध्दा परवानगी देण्यात आली आहे. अकुशल कामगारांना 256 रुपये प्रतिदिन याप्रमाणे मजुरी दर आहे.

रासायनिक खतांचा खर्च आर्थिक मापदंडातून वगळण्यात आला असून, त्याऐवजी नाडेप कंपोस्ट व गांडूळखताचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. क्षेत्र परिस्थितीनुसार लागवडीचे अंतर कमी-जास्त करण्यास परवानगी आहे. परंतु, देय अनुदान व फळपीक लागवडीचे निकष विद्यापीठ शिफारशीनुसारच मर्यादित राहील. अतिरिक्त कलमे/रोपे यांचे अनुदान देय राहणार नाही.
असे मिळेल अनुदान

लागवड वर्षासह सलग 3 वर्षांत मंजूर अंदाजपत्रकानुसार अनुदान देय राहील. दुसर्‍या व तिसर्‍या वर्षी बागायती फळपिकांसाठी जे लाभार्थी 90 टक्के फळझाडे जिवंत राहतील व कोरडवाहू फळपिकांसाठी 75 टक्के फळझाडे जिवंत ठेवतील अशाच लाभार्थ्यांना दुसर्‍या व तिसर्‍या वर्षाचे अनुदान देय राहील. वैयक्तिक बांधावरील फळपिके लागवडीसाठी हेक्टरी 20 रोपे या मर्यादेत फळपिकांची लागवड ही योजना राबविण्यात येत असून, यासाठीदेखील अनुदान देय आहे.

 

Back to top button