T20 World Cup 2022 : ‘पिक्चर अभी बाकी हैं..!’ | पुढारी

T20 World Cup 2022 : ‘पिक्चर अभी बाकी हैं..!’

विश्वचषकातील (T20 World Cup 2022) पावसाचा प्रभाव काही संपायची चिन्हे नाहीत. द. आफ्रिका आणि पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि पाकिस्तानला स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवता आला. या सामन्याने आपल्या गटाची समीकरणे पुन्हा बदलू शकतात. आपल्या गटात सर्वच संघांचे आता प्रत्येकी एक सामने उरले आहेत. पाकिस्तान या विजयाने तिसर्‍या स्थानावर आले. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या सामन्यात जो जिंकेल त्याचे गुण 6 होतील. द. आफ्रिका आज पाच गुणांनी दुसर्‍या स्थानावर आहे. त्यांचा नेदरलँडशी सामना बाकी आहे. तो ते जिंकतीलच आणि त्यांचे 7 गुण होतील. भारताचा झिम्बाब्वेशी सामना बाकी आहे. भारताने तो जिंकला तर भारताचे 8 गुण होतील आणि द. आफ्रिकेचे 7 म्हणजेच भारत, द. आफ्रिका पहिला आणि दुसर्‍या स्थानावर असतील.

भारताच्या सामन्यात पावसाचे विघ्न आले तर भारत आणि झिम्बाब्वे यांना एक एक गुण मिळून भारतचेही सात गुण होतील. आज द. आफ्रिकेचा नेट रनरेट 1.441 हा भारताच्या 0.730 पेक्षा खूप जास्ती आहे आणि तो नेदरलँडविरुद्धच्या सामन्याने अजून वाढेल. तेव्हा या परिस्थितीत भारत आणि द. आफ्रिका दोघांचे 7 गुण असले तरी द. आफ्रिका पहिल्या स्थानावर असेल आणि भारत दुसर्‍या. जर भारत दुर्दैवाने झिम्बाब्वेविरुद्ध हरला तर भारत आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजयी संघाचे 6 गुण होतील आणि नेट रनरेटवर संघ पुढे जाईल.

भारताचा नेट रनरेट 0.730 हा आज पाकिस्तानच्या 1.117 रनरेटपेक्षा कमी आहे. तेव्हा भारताने झिम्बाब्वे विरुद्ध जिंकणे हाच उत्तम पर्याय आहे. या सर्व जर-तर मध्ये द. आफ्रिका नेदरलँडविरुद्ध मोठ्या फरकाने जिंकेल हे गृहीत धरले आहे, पण या स्पर्धेत कुणालाच गृहीत धरता येत नाही. हा सामना जर पावसाने वाहून गेला तर द. आफ्रिका 6 गुणांवर राहील आणि समीकरणे पुन्हा बदलतील. जर द. आफ्रिकेचा पराभव झाला तर पाकिस्तान किंवा बांगलादेशचा मार्ग मोकळा होईल. पहिल्या गटाचे दोन महत्त्वाचे सामने आज होत आहेत.

न्यूझीलंडने आयर्लंडचा पराभव केला तर ते अव्वल स्थानी असतील. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने हरवणे गरजेचे आहे तरी त्यांचा मार्ग बिकटच आहे. इंग्लंड-श्रीलंका सामन्यावर ऑस्ट्रेलियाचे भवितव्य अवलंबून राहील. श्रीलंकेने इंग्लंडला हरवले तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात रनरेटवर संघ पुढे जाईल. आज ऑस्ट्रेलिया त्यांच्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या मोठ्या पराभवाची फळे भोगत आहे. त्यांचा नेट रनरेट हा -0.304 आहे तर इंग्लंडचा +0.547 आहे. इथेही न्यूझीलंड आयर्लंडला हरवेल हे गृहीत धरले आहे. जर न्यूझीलंड हरले तर ते 5 गुणांवरच अडकतील. (T20 World Cup 2022)

थोडक्यात काय सांगायचे तर कागदोपत्री शक्यता या विश्वचषकात शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत चालू राहणार आहेत, पण क्रिकेटचा विचार केला न्यूझीलंड वि. द. आफ्रिका आणि भारत वि. इंग्लंड या उपांत्य फेरीची शक्यता जास्त वाटत आहे. उपांत्य फेरीसाठी विश्वचषकाच्या लढती या ‘अ’ गटातील अव्वल ‘ब’ गटातील दुसर्‍या क्रमांकाशी तर ‘ब’ गटातील अव्वल हा ‘अ’ गटातील दुसर्‍या क्रमांकाशी खेळणार आहे. यातली पहिली उपांत्य फेरी सिडनी तर दुसरी अ‍ॅडलेडला होणार आहे, पण स्पर्धेचा नियम असा आहे की जर यजमान ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीला पात्र ठरले तर ते सिडनीलाच खेळतील म्हणजेच सर्व समीकरणे आणि सामन्याच्या जागा पुन्हा बदलतील. एकंदरीत या विश्वचषकाबद्दल ‘पिक्चर अभी बाकी हैं’, असेच म्हणावे लागेल.

निमिष पाटगावकर

Back to top button