पुणे : प्लेटलेट्सचा तुटवडा, अनेक रक्तपेढ्यांमध्ये 2-3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक | पुढारी

पुणे : प्लेटलेट्सचा तुटवडा, अनेक रक्तपेढ्यांमध्ये 2-3 दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये एका रुग्णाला डेंग्यू झाल्याने तातडीने प्लेटलेट्सची गरज भासत होती. रुग्णाच्या नातेवाइकांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश रक्तपेढ्यांशी संपर्क साधूनही प्लेटलेट्स मिळत नव्हत्या. अखेरीस रक्ताचे नाते ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळणे शक्य झाले. दिवाळीच्या दिवसांमध्ये शहरात रक्तदान शिबिरे न झाल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये 2-3 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

दिवाळीमध्ये महाविद्यालये, आयटी कंपन्या बंद असल्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन झाले नाही. त्यातच सध्या पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात निदान होत आहे. प्लेटलेट्सचे प्रमाण खूप कमी झाल्यास गरजेनुसार डॉक्टरांकडून प्लेटलेट्स देण्याचा निर्णय घेतला जातो. डेंग्यूच्या एका रुग्णाला 4 ते 8 आरडीपी अर्थात रँडम डोनर प्लेटलेटची गरज भासते.
एका रक्तदात्याच्या रक्तातून 50 ते 60 एमएल आरडीपी मिळते. आरडीपीच्या तुलनेत एसडीपी अर्थात सिंगल डोनल प्लेटलेट काढण्यासाठी दोन-तीन तासांचा वेळ लागतो आणि एसडीपीची किमतही जास्त असते. प्लेटलेट्सची शेल्फ लाइफ 5 दिवसांची असते.

ससूनमध्येही अपुरा साठा
ससून आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय या दोन प्रमुख रुग्णालयांद्वारे संचालित रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा साठा कमी झाला आहे. दोन्ही रुग्णालयांमध्ये सध्या दोन दिवस पुरेल इतकाच साठा असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ससूनमध्ये फक्त 20 युनिट्स शिल्लक आहेत आणि वायसीएममध्ये सुमारे 15 युनिट शिल्लक आहेत.

रक्तसाठ्याबाबतही चिंता
खासगी रक्तपेढ्यांमधील साठा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चांगला आहे. पण, प्लेटलेट्सव्यतिरिक्त रक्ताच्या कमी साठ्याबद्दल देखील चिंता आहे, असे इंडियन सोसायटी ऑफ ब्लडबँक्स आणि इम्युनोहेमॅटोलॉजीच्या सचिव डॉ. पूर्णिमा राव यांनी सांगितले.

 

डेंग्यूमध्ये प्रतिक्युबिक एमएल प्लेटलेटची संख्या किमान दीड लाख असणे गरजेचे असते. प्लेटलेट्स प्रमाणापेक्षा जास्त कमी झाल्याने नाक, डोळे, मेंदू येथून रक्तस्राव होण्याची शक्यता असते. प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित होणे आणि नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे.
– राम बांगड, अध्यक्ष, रक्ताचे नाते ट्रस्ट

Back to top button