बुलढाणा : चहातून गुंगीचे औषध देऊन गाडी घेऊन पसार झालेल्या दोघे जेरबंद | पुढारी

बुलढाणा : चहातून गुंगीचे औषध देऊन गाडी घेऊन पसार झालेल्या दोघे जेरबंद

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : चारचाकी गाडीच्या मालकाला चहातून गुंगीचे औषध देऊन गाडी घेऊन पसार झालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून तवेरा गाडी (क्रमांक एम. एच 28 व्ही 8686) ताब्यात घेण्यात आली. अचलपूर तालुक्यातील पर्सापूर येथील शंभुसिंग तुळशिरामजी विजोटे (वय 51), दर्यापूर तालुक्यातील बेंबळा येथील प्रवीण ऊर्फ आकाश सुखदेव कांबळे (वय 29) या दोघांना जेरबंद करण्यात आले. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी, २१ ऑक्टोबररोजी शेगाव शहरातील मंगेश वसंतराव हिवाळे याची गाडी आरोपींनी भाडयाने घेतली होती. चार अज्ञात व्यक्ती या गाडीमध्ये बसले. त्यानंतर गाडी जळगाव, जामोदकडे घेण्यास सांगितली. यावेळी पातुर्डा फाटा येथे आरोपींनी मंगेश याला चहामध्ये गुंगीच्या गोळया टाकून बेशुध्द केले. त्याचे हात-पाय बांधून मध्यप्रदेशमधील संग्रामपूर या गावाजवळील शेतामध्ये सोडण्यात आले. मंगेश याला शुद्ध आल्यानंतर त्यांची तवेरा गाडी क्रमांक एम. एच 28 व्ही 8686 किंमत 3 लाख 75 हजार रुपये व नगदी 300 रुपये आणि मोबाईल 500 रु. असा एकूण 3 लाख 75 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. मंगेश यांच्या तक्रारीवरून शेगांव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकाने शेगांव शहर व मध्य प्रदेशपर्यत जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंतर पथकाने आणखी तांत्रिक पध्दतीचा अवलंब करुन त्यामधून मिळालेल्या माहितीनुसार 29 ऑक्टोबर रोजी आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून तवेरा गाडी हस्तगत केली.

ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमित वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक विलासकुमार सानप, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील, गजानन गोरले, रवी भिसे, राजू आडवे, कैलास ठोंबरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचलंत का ? 

 

 

Back to top button