पावसाचे पाणी अजूनही शेतातून निघेना | पुढारी

पावसाचे पाणी अजूनही शेतातून निघेना

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  पावसाने नगर तालुक्याच्या दक्षिण परिसरातील शेतकर्‍यांना सुरुवातीला वाट पाहायला लावली. शेवटी परतीच्या पावसाने याच परिसरात दाणादाण उडवून दिली. परतीचा पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेवटी बळीराजावर रडण्याची वेळ आली. ऐन काढणीच्या काळातच पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. आजही अनेक शेतातून पानी निघालेले नाही. परिसरातील तलाव तुडूंब भरले. शेतात पाणीच पाणी झाल्याने हातातोंडाशी आलेले पिके मातीमोल होताना शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी आले. शेत पिकांतही पाणी अन् बळीराजाच्या डोळ्यातही पाणी अशी स्थिती परतीच्या पावसामुळे तालुक्याच्या दक्षिण परिसरात सध्या पाहावयास मिळतेय. पावसाने पिकांचे अतोनात नुकसान शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत ढकलणार आहे. हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी आर्थिक मदतीसाठी शासनाकडे साकडे घातले आहे.

नगर तालुक्यातील दक्षिण परिसरातील वाळकी, गुंडेगाव, राळेगण, सारोळा कासार, खडकी, घोसपुरी, रुई छत्तीशी, गुणवडी, देऊळगाव सिद्धी, हिवरे झरे, वडगाव तांदळी, आंबिलवाडी, मठपिंप्री, दहिगाव आदी परिसरातील शेतकरी पावसाळ्याचे तीन महिने सरले तरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. या परिसरातील पाझर तलाव पावसाळ्याच्या मध्यांवरही कोरडे ठाक असल्याचे चित्र होते. पावसाच्या प्रतिक्षेत असणार्‍या शेतकरी परतीच्या पावसाची आशा बाळगून होता. मात्र, परतीच्या पावसाने शेवटी दिलासा दिला असला, तरी पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हाता. यामुळे बळीराजाची पाचावर धारण अशी स्थिती झाली होती. परतीच्या पावसाने दक्षिणेतील तलाव पूर्ण क्षमेतेने भरले; मात्र पावसाची दाणादाण वाढत गेल्याने शेतीसह पिकंही पाण्यात गेली.

आठवडाभर झालेल्या पावसाने शेतात गुडघ्याच्यावर पाणी साचले. यामुळे खरीपातील पिके पाण्यात गेली अन् ही पिके मातीमोल झाली. सोयाबीन, मका, तूर, कांदा आदी पाण्यात असणारी पिके सडली आहेत. दिवाळी सणाचा बळीराजाच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद पावसाने हिरावून घेतला. नगर तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांतून एकदा पडणार्‍या दुष्काळाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतो. यंदा मात्र दुष्काळातून शेतकर्‍यांची मुक्तता झाली असली, तरी ओल्या दुष्काळाचे सावट शेतकर्‍यांवर ओढावले. अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी कंगाल झाला.

मका, कडवळ, घास चारा पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकर्‍यांपुढे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उभा ठाकला आहे. परतीच्या पावसामुळे मका, सोयाबीन, तूर, उडीद, कांदा, कांदा रोपे, बाजरी, ज्वारी पिके पाण्यात आहेत. मावा आणि करप्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आधीच कांदा लागवडीवर परिणाम झाला.

अतिवृष्टी अन् वातावरणातील बदलामुळे संत्रा फळबागांना मोठा फटका बसला. संत्राबागा कमी प्रमाणात फुटल्याने परिणामी झाडांवर लगडणार्‍या फळांची संख्या घटली. पावसामुळे फळ गळतीचे प्रमाण वाढल्याने फळ उत्पादन घटणार आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार यात शंका नाही.

पंचनाम्यासाठी अधिकार्‍यांनी शेतावर जायचे कस
पाऊस थांबत नसल्याने शेतात पाणीच पाणी झालेले आहे. शेतावर जाणारे रस्ते, पाऊल वाट चिखलमय झाली आहे. पायी चालतानाही शेतकर्‍यांना कसरत करावी लागतेय. शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी अडचण येत असताना पंचनाम्यासाठी येणार्‍या अधिकार्‍यांनी गुडघाभर चिखल तुडवत जायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

 

अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके पाण्यात गेली. सोयाबीन काढणीच्या मार्गावर असताना पावसामुळे पाण्यातच सडली. तूर पिकं दोन आठवड्यापासून गुडघाभर पाण्यात आहेत. कांद्यांचे नुकसान झाले. उत्पन्नाची मका पिकेही पाण्यामुळे सडली. पावसाचा सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. परिणामी रब्बी पिकांच्या पेरण्याही लांबणीवर गेल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेला, रब्बीची शाश्वती नाही, त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत जाहिर करावी.
                                                     -बाळासाहेब बोठे, शेतकरी, वाळकी

 

दरवर्षी ऑक्टोबरमध्ये 44 मिमी. पाऊस पडतो. यावर्षी तब्बल 144 मिमी. पाऊस पडला आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात महसूल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती तिन्ही विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, मंडलअधिकारी पंचनामे करत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पंचनामे जिल्हाधिकार्‍यांच्याकडे सपूर्द करण्यात येतील. त्यानंतर शासनाकडे पाठविले जातील.
                                            – पोपटराव नवले, नगर तालुका कृषी अधिकारी

Back to top button