पर्यटनाचा सुपर संडे; पुण्यातील पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल | पुढारी

पर्यटनाचा सुपर संडे; पुण्यातील पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पर्यटकांनी शहरातील सर्वच पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी केल्याने अनेक ठिकाणी रविवारी (दि. 30) वाहतूक कोंडी झाली होती. कात्रजच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाबाहेर तर रस्त्यावरच चारचाकी व दुचाकींची रांग लागल्याने वाहतूक पोलिसांना त्या गाड्या उचलून न्याव्या लागल्या.

रविवारी हा दिवाळी सुटीतील शेवटचा सुटीचा दिवस असल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी शहरातील विविध पर्यटन स्थळांकडे धाव घेतली. सकाळीच सहकुटुंब सहपरिवार अशी गर्दी करत सारसबाग, पर्वती, शनिवारवाडा, आगाखान पॅलेस आणि कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे पर्यटकांनी गर्दी केली. कडक उन्हामुळे टोपी, गॉगल, डबा, वॉटर बॅगसह बच्चे कंपनी आई-बाबांसोबत या ठिकाणी आली होती. शनिवारवाडा सकाळीच गर्दीने भरून गेला.

पीएमपीची ‘पुणे दर्शन’ बस जोरात
स्थानिक पर्यटकांसह विविध राज्यांतील पर्यटक पुण्यात आलेले पाहावयास मिळाले. अनेकांनी खासगी गाड्या बुक करून आणल्या होत्या, तर काही पर्यटकांनी पीएमपीच्या ‘पुणे दर्शन’ने प्रवास केला. बहुतांश पर्यटक हे दक्षिण भारतातून आल्याचे दिसले.

सेल्फीसाठी गर्दी…
सर्वच पर्यटन स्थळांवर तरुणाईची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. आगाखान पॅलेस, पर्वती, पाताळेश्वर, शनिवारवाडा येथे सेल्फी घेण्यात पर्यटक गुंग झाले होते. शनिवारवाड्यात वरच्या मजल्यावर जाऊन अनेकांनी फोटो घेतले.

वाहतूक पोलिसांना दिवसभर काम…
पर्यटक उत्साहाने शहरातील पर्यटन स्थळांवर फिरत होते. प्रत्येक ठिकाणी चारचाकी व दुचाकींची गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक पोलिस टोईंग व्हॅनच्या मदतीने सर्व पर्यटन स्थळांवरच फिरून ‘नो पार्किंग’मधील वाहने उचलत होते.

Back to top button