बंधार्‍यावरील बर्गे चोरणारी टोळी जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांची कामगिरी | पुढारी

बंधार्‍यावरील बर्गे चोरणारी टोळी जेरबंद; वडगाव निंबाळकर पोलिसांची कामगिरी

बारामती; पुढारी वृत्तसेवा: निरा नदीवरील बंधार्‍याचे बर्गे चोरणार्‍या टोळीचा छडा लावण्यात वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात एकूण आठ जणांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे. गणेश शंकर जाधव (रा. निरा, ता. पुरंदर), शुभम किसन बरकडे (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा), विकास बाजीराव गायकवाड (रा. बोरीऐंदी, ता. दौंड), विशाल चव्हाण, शशांक सोनवणे (रा. निरा), आर्यन माचरे, शुभम माचरे (रा. पाडेगाव, ता. खंडाळा) व चोरीचा माल विकत घेणारा अभिजित कोंडीबा भोसले (रा. यवत, ता. दौंड) यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील जाधव, बरकडे, गायकवाड व भोसले या चौघांना अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी याबाबतची माहिती दिली. लाटे (ता. बारामती) गावच्या हद्दीत निरा नदीच्या बंधार्‍याजवळील जलसंपदा विभागाच्या चौकीच्या मोकळ्या जागेतील मैदानातून बंधार्‍याचे 57 हजार रुपयांचे 40 लोखंडी बर्गे चोरीला गेले होते. याप्रकरणी राजेंद्र निंबाळकर (रा. कांबळेश्वर) यांनी दि. 24 ऑक्टोबर रोजी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याची पडताळणी करीत गणेश जाधव याला निरेतून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देत इतरांची नावे सांगितली. या गुन्ह्यात वापरलेला टेम्पो (एमएच 12 सीटी 9000) जप्त करण्यात आला असून, चोरीला गेलेले दहा हजारांचे पाच बर्गे हस्तगत करण्यात आले आहेत.
सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शेलार, महेश पन्हाळे, महेंद्र फणसे, रमेश नागटिळक, सूर्यकांत कुलकर्णी, हिरामण खोमणे, भाऊसाहेब मारकड, पोपट नाळे, अमोल भुजबळ आदींनी ही कामगिरी केली.

Back to top button