सांगली : परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : जाडरबोबलाद येथे आम्ही सांगितलेल्या गायी न आणता वेगळ्याचं गायी का आणल्या? अशी विचारणा करत हरियाणा येथील एका चालकासह कामगाराला ८ दिवस बेकायदेशीररित्या डांबून ठेवून दमदाटी व मारहाण केल्याचा प्रकार घडला. अनिल राजवीर पांचाळ (वय.३७) व आकाश बलवीर (रा.कुंजपुरा ता. बसंती, हरियाणा) असे डाबून ठेवलेल्या चालक व कामगाराचे नाव आहे.

बेकायदेशीर वाहन चालकासह कामगाराला डाबून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते महादेव रामाना अंकलगी व जितेंद्र महादेव अंकलगी या पिता- पुत्रावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अनिल पांचाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महादेव अंकलगी यांनी हरियाणा येथील व्यापाऱ्याशी मोबाईलवरून गायी खरेदीचा व्यवहार ठरवला. त्यानुसार संबंधित व्यापाऱ्याने एका ट्रान्सपोर्टमध्ये ठरल्याप्रमाणे वाहनात गाई भरून दिल्या. सोबत एक कामगारही पाठवला. दरम्यान संबंधित व्यापाऱ्याने हरियाणातून २० ऑक्टोबर रोजी गाई भरून टेम्पो जाडरबोबलाद येथे आणला होता. यापूर्वी दाखवलेल्या गायी यामध्ये नाहीत. नऊ गायी बदलून आणल्या असल्याचे म्हणणे अंकलगी यांचे होते .

२० ऑक्टोबरपासून चालक अनिल पांचाळ व आकाश बलवीर या दोघांना अंकलगी पिता-पुत्राने मारहाण करत डांबून ठेवले व घरातील कामे करण्यास भाग पाडले .यावेळी अनिल पांचाळ यांनी एका व्यक्तीच्या मोबाईलवरून पोलीस हेल्पलाइनला संपर्क साधला. यानंतर उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांची सुटका केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button