राजगुरुनगर : पावसाने फुलांचे उत्पादन घटले | पुढारी

राजगुरुनगर : पावसाने फुलांचे उत्पादन घटले

पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी वाढली आहे. मात्र, पावसाचा फटका बसल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. परिणामी झेंडूच्या फुलांचे भाव गेल्या काही दिवसांपासून चढेच आहेत. किरकोळ बाजारात किमान 80 ते 100 रुपये किलो भावाने विक्री
होत आहे.  खेड तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात फुलाची शेती केली जाते. यंदा दसरा व दिवाळी या सणांना फुलांना चांगला बाजारभाव मिळेल या आशेने शेतकर्‍यांनी झेंडूची लागवड केली होती. मात्र, परतीच्या पावसाने थैमान घातल्याने फुलांचे मळे मातीमोल झाले. पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे.

दिवाळी व पाडवा सणाला झेंड़ूच्या फुलांना महत्त्व असते. पूजेसह घराला तोरण बांधणे, सजावट, वाहनांना झेंडूच्या फुलांचे हार घातले जातात. त्यामुळे विक्रीतून फूल उत्पादक शेतकर्‍यांची चांगली कमाई होईल असे चित्र आहे. दावडी, निमगाव, खरपुडी परिसरात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली. फूल उत्पादक शेतकरी दिवाळी सणांमुळे फुलांची तोडणी करताना दिसत आहेत. गेले आठवडाभर या परिसरात पाऊस पडत असल्याने फुलांना फटका बसला आहे. फुलाच्या प्रतीवर त्याचा परिणाम झाला आहे. तरीही चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त  करीत आहेत.

Back to top button