लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड | पुढारी

लोणावळा बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड

लोणावळा, पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या सणाच्या खरेदीसाठी लोणावळा बाजारात शुक्रवारी मोठी गर्दी झाली होती. आकाश कंदील, पणत्या, लायटिंग, लक्ष्मपूजनासाठी देवीच्या मूर्ती व साहित्यासह कपडे खरेदीसाठी गर्दीने बाजारपेठ फुलून गेली होती.

आकाश कंदिलला सर्वाधिक मागणी

लॉकडाऊननंतर ही पहिलीच दिवाळी असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. दिव्यांचा सण असल्यामुळे आकाशकंदिल तसेच रंगीबेरंगी पणत्या खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. यंदा लायटिंग असलेल्या आकाश कंदिलाला मोठी पसंती मिळत आहे. तर, थ्रीडीमध्ये रंगवलेल्या पणतीलाही सर्वांधिक मागणी आहे. याशिवाय लहान मुलांसाठी तयार किल्ले, त्यावरील चित्र तसेच फटाके खरेदीसाठी बच्चे कंपनी आपल्या पालकांसह गर्दी करताना दिसत आहे. तसेच, फराळाचे पदार्थ खरेदी करतानाही अनेक नागरिक दिसत होते.

बाजारपेठेत उत्साह

मागील दोन वर्ष कोरोामुळे लोणावळा शहरात लॉकडाउनचे निर्बंध होते. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प होता. यावर्षी सरकारने सर्व निर्बंध शिथिल केले असल्यामुळे निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत यंदा वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
शहरातील व्यापार्‍यांनी कपडड्यांच्या खरेदीवर विशेष सवलत दिली आहे. अनेकांचा बोनस झाल्यामुळे बाजारपेठेतही आपल्या मुलांना कपडे खरेदी करताना पालक दिसत आहेत. त्यामुळे यंदा चांगला व्यवसाय होत असल्यामुळे व्यापारी खूश दिसत आहेत. परंतु, मागील दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील गर्दी मंदावली होती. सध्या पाउस कमी झाला असल्यामुळे पुन्हा खरेदीसाठी बाजारेपठेत गर्दी होवू लागली आहे.

दिवाळीनिमित्त खास सवलत

लाईटच्या तोरणांनाही मोठी मागणी असल्याची माहिती विक्रेते किरण येवले यांनी दिली. कापड मार्केटमध्येही गर्दी उसळली असून लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न व्यापारी, दुकानदार करताना दिसत आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी कापडे व रेडिमेड विक्री करणार्‍यांनी सवलती दिल्या आहेत.

Back to top button