पिंपरी: पालिकेच्या कृपादृष्टीची ज्योतिबानगरला प्रतीक्षा ! बावीस वर्षांपासून रस्ता; ड्रेनेजची सुविधा नाही | पुढारी

पिंपरी: पालिकेच्या कृपादृष्टीची ज्योतिबानगरला प्रतीक्षा ! बावीस वर्षांपासून रस्ता; ड्रेनेजची सुविधा नाही

गिरीश बक्षी

चिखली: मनपात समावेश झाल्यापासून काही भागात आजही पालिकेने कृपादृष्टी टाकली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. औद्योगिक वसाहत असलेल्या ज्योतिबानगरच्या काही भागातून मनपा करोडो रुपयांचा मालमत्ता कर वसूल करते. पण रस्ते, सार्वजनिक शौचालय, कचरा व्यवस्थापन याबाबत गेली बावीस वर्षे एकही सुविधा देण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ज्योतिबानगरमधील गट नंबर 258,नॅशनल वजन काटासमोरील भाग हा रेडझोनमध्ये असून, सदर भागात तीस,पस्तीस वर्षांपासून उद्योग आणि व्यवसाय करत असलेले अनेक व्यावसायिक आणि उद्योजक पायाभूत सुविधा नसल्याने वैतागले आहेत. वर्षाला दोन लाख ते पाच लाख असा मालमत्ता कर भरूनही सुविधा नाही. कचराकुंडी, घंटागाडी आदींची सुविधा मागणी केल्यावर महिन्याला पैसे दिल्यावरच कचरा उचलू, असे ठेकेदारांची माणसे सांगतात. रस्त्यावर खड्डे, साचलेले पाणी यामुळे या भागात नोकरीला माणसे मिळत नाहीत आणि महिला तर पायाभूत सुविधा नसल्याने या भागात यायला घाबरतात, असे एका उद्योजकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

सेवा न मिळाल्यास उद्योग चाकणला जातील

पालिकेच्या महसुलात उद्योजकांचा सिंहाचा वाटा आहे,परंतु सगळ्यात वाईट, अशी वागणूक पालिका आपल्या सेवा देताना देते, असे उद्योजक सांगतात. पुढील काळात परिस्थिती सुधारली नाही तर उद्योग चाकण अथवा अन्यत्र हलवावे लागतील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे.

सुविधा नाही, मग कर कसा मागता?

महापालिका अधिकारी रेडझोन असल्याचे कारण सांगत सुविधा दिल्या जाऊ शकत नसल्याचे सांगतात. मग कर कुठल्या आधारे मागतात? तसेच, रेडझोन असलेल्या याच भागातील काही ठिकाणी रस्ते, गटारे, कचरा व्यवस्थापन, शौचालये आदी सगळे कसे काय येते? असा प्रश्नही उद्योजकांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेने या बाबत त्वरित लक्ष घालून उद्योजकांच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, याबाबत आमदार महेश लांडगे आणि मनपा आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-टीकाराम शर्मा,अध्यक्ष, ज्योतिबानगर इंटरप्रेनर्स असोसिएशन

Back to top button