दोस्ती तुटायची नाय! ‘काश्मीर’ मुद्यावरून रशियाचा चीन-पाकिस्तानला दणका | पुढारी

दोस्ती तुटायची नाय! ‘काश्मीर’ मुद्यावरून रशियाचा चीन-पाकिस्तानला दणका

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने जम्मू-काश्मीर, लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. रशियन सरकारने जारी केलेल्या SCO सदस्य देशांच्या नकाशाने हे सिद्ध केले आहे. रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकच्या म्हणण्यानुसार, जारी केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि अक्साई चीन तसेच संपूर्ण अरुणाचल प्रदेश भारताचा भाग आहे. पाकिस्तान आणि चीन हे देशही SCO चे सदस्य आहेत. असे असूनही रशियाने हे पाऊल उचलत या दोन देशांना दणका दिला आहे.

या नकाशामुळे जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि एससीओमध्ये भारताची बाजू आणखी मजबूत झाली आहे. अलीकडेच अमेरिकेच्या राजदूताने पीओकेला भेट दिली होती. तसेच या भागाला ‘आझाद काश्मीर’ म्हणून संबोधले होते. जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्सची भूमिका महत्त्वाची असल्याचे सुचवले होते.

Image

चीनने अलीकडेच SCO साठी चूकीचा नकाशा प्रसिद्ध केला होता. त्या नकाशात चीनने भारतातील काही भाग आपलाच भूभागाचा असल्याचे दाखवून विस्तारवादाचे धोरण स्पष्ट केले होते. एका सरकारी सूत्राने सांगितले की, SCO च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या रशियाने भारताच्या नकाशाचे अचूक चित्रण केल्याने याची एक जागतिक पातळीवर महत्त्वाची नोंद झाली आहे.

रशियाने 1947 पासून काश्मीर मुद्यावरून भारताला पाठिंबा दिला आहे. तसेच भारतविरोधी ठराव रोखण्यासाठी यूएनएससी (UNSC)मध्ये व्हेटोचा वापर केला आहे. मॉस्कोने वारंवार सांगितले आहे की, काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे, त्यामुळे या वादाचे आंतरराष्ट्रीयीकरण होऊ नये.

Back to top button