यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा अखेर वसंत कारखाना भाडेतत्त्वावर; याच वर्षी सुरु होणार गाळप | पुढारी

यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा अखेर वसंत कारखाना भाडेतत्त्वावर; याच वर्षी सुरु होणार गाळप

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना अखेर भाडेतत्त्वावर गेला असून, कारखान्याचा ऊस गाळप हंगाम याच वर्षी सुरु होणार आहे. विदर्भ- मराठवाड्याच्या यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी हा कारखान अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हा कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह  मराठवाड्यातील सात कारखान्यांनी निविदा भरली होती. खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना भैरवनाथ शुगर उस्मानाबाद या नावाखाली चालवण्यास घेतला असून, दरवर्षी 75 लाख ठराविक  भाडे आणि गाळपवार प्रति टन 172 रुपये भाडे याप्रमाणे हा कारखाना  भाडेतत्त्वावर घेतला आहे. सोमवारी(दि,१७) रोजी त्यांची निविदा मंत्री समितीने  मंजूर केली आहे. त्यामुळे, हा कारखाना  पाच वर्षाच्या खंडित वाटचाली नंतर सूरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने जिल्ह्यासह शेजारील कारखान्यांनी शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली होती. काही शेतकऱ्यांना तर शेतातील ऊस कारखान्यापर्यंत पाठविण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागला. जिल्ह्यातील सुरू असलेल्या कारखान्यासह जिल्हा शेजारी सर्वच कारखाने खासगी मालकीची असल्याने त्यांच्या, ‘मोनोतल्ली’ ला शेतकरी बळी पडले. परंतु विदर्भातील शासकीय ताब्यातील हा सहकारी तत्वावरील कारखाना भाडेतत्त्वावर दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. हा कारखाना सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी कमी होणार आहेत.

पुसद महागाव, उमरखेड आणि हदगाव व हिमायतनगर या पाच तालुक्याची कामधेनू असलेला हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा कारखाना चालू होणार असल्याने उसाची लागवड निश्चितच वाढणार आहे. विशेष म्हणजे हा कारखाना चालू लागवड हंगामात भाडेतत्त्वावर गेला असल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच या विभागाचे खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना घेतल्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे. हा कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आमदार नामदेव ससाने, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तसेच कारखान्याचे आवसायक योगेश गोतरकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

अधिक वाचा :

Back to top button