PM-Kisan Samman Nidhi | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; किसान सन्मानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा | पुढारी

PM-Kisan Samman Nidhi | मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; किसान सन्मानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१७) शेतकऱ्यांना दिवाळीची भेट दिली. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-Kisan Samman Nidhi) १२ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या एका क्लिकनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ही रक्कम जमा झाली. पंतप्रधान मोदी यांनी १६ हजार कोटींचा PM-KISAN निधी जारी केला आहे. PM-KISAN अंतर्गत आत्तापर्यंत २ लाख कोटी रुपये वितरीत केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी किसान सन्मान योजनेची रक्कम एका क्लिकवर वितरीत केली.

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. ३ हप्त्यात ४ महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. यंदा दिवाळीआधी पीएम सन्मान निधीच्या १२ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

सामान्यत: या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचा सण गोड करण्याच्या उद्देशाने या महिन्यातच सरकारकडून १२ वा हप्ता जमा करण्यात आला.
दरम्यान, १२ वा हप्ता जमा करण्यापूर्वी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. अजूनही काही शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी केले नाही त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. दरम्यान या योजनेचा ११ वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. (PM-Kisan Samman Nidhi) अधिक माहितीसाठी https://pmkisan.gov.in/ यावर क्लिक करा.

शेतकऱ्यांनी या क्रमांकावर संपर्क साधावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. योजनेचा हा बारावा हप्ता आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले असल्याचे सरकारकडून सोमवारी सांगण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे आलेले नाहीत, त्या शेतकऱ्यांनी 155261, 1800115526 अथवा 011-23381092 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (PM-Kisan Samman Nidhi)

पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे “पीएम किसान सन्मान संमेलन २०२२” या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशभरातील १३,५०० हून अधिक शेतकरी आणि सुमारे १५०० ॲग्री स्टार्टअप एकत्र आले आहेत. विविध संस्थांशी जोडलेले १ कोटींहून अधिक शेतकरी या कार्यक्रमाला व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात संशोधक धोरणकर्ते आणि इतर भागधारकांचाही सहभाग असेल.

हे ही वाचा :

Back to top button