पुणे : विद्यापीठाचा दर्जा सुधारला; टाईम्स रँकिंगमध्ये सहाशे ते आठशेच्या गटात मिळाले स्थान | पुढारी

पुणे : विद्यापीठाचा दर्जा सुधारला; टाईम्स रँकिंगमध्ये सहाशे ते आठशेच्या गटात मिळाले स्थान

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये सुधारणा झाली असून, विद्यापीठाला 601-800 या क्रमवारीच्या गटात स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी विद्यापीठाला 801 ते 1000 या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. कोविड काळात आजाराची भीती, आंतरराष्ट्रीय वाहतूक आदी कारणांमुळे विद्यापीठातील परदेशी विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला होता. मात्र, आता कोविडनंतर परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर आली असून, विद्यापीठाने आपले स्थान पुन्हा प्राप्त केले आहे.

द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग जाहीर झाली असून, त्यात विद्यापीठाच्या गुणांकनामध्ये वाढ झाली आहे. या पूर्वी 2019 सालामध्ये विद्यापीठाला 501-600 या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. आयसरचे गुणांकन घसरले असून, यंदा आयसर पुणेला 1001-1200 या क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

गेल्या वर्षी आयसरला 801-1000 या क्रमवारीत स्थान मिळाले होते. आयआयएस्सी बंगळुरुने आपल्या शैक्षणिक कामगिरीत सातत्य राखले असून, 251-300 या क्रमवारीत स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठाने बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी, ग्राफिक एरा युनिव्हर्सिटी, आयआयटी इंदूर, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा विद्यापीठांच्या श्रेणीत स्थान मिळवले आहे. पुणे विद्यापीठानंतर अण्णा युनिव्हर्सिटी आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा क्रमांक आहे.

यंदा जाहीर झालेल्या द टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंगमध्ये देशातील 75 शिक्षण संस्थांनी स्थान पटकावले होते. ही संख्या 2020 मध्ये 53 होती, तर 2017 मध्ये केवळ 37 होती. त्यामुळे रँकिंगमध्ये स्थान मिळवणार्‍या संस्थांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
या रँकिमध्ये प्रामुख्याने केंद्रीय विद्यापीठे, आयसर आणि आयआयएस्सी समावेश असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जगातील पहिल्या पाच युनिव्हर्सिटीमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, हॉवर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, एमआयटी (अमेरिका) यांनी स्थान पटकावले आहे.

विद्यापीठाची क्रमवारी उंचावण्यात विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक, सर्व कर्मचारी यांचे परिश्रम आहेत, हे सामुदायिक योगदान आहे. भविष्यातील विद्यापीठाच्या वाटचालीचा आराखडा तयार केला असून, सर्वांनी मिळून भविष्यातील उद्दिष्ट्ये गाठण्यास प्रयत्न सुरू केले आहेत.
                          – डॉ. कारभारी काळे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यापीठाच्या कामाला मिळालेली ही पावती आहे, असे मला वाटते. विद्यापीठात मोठ्या प्रमाणात संशोधनाचे काम करणारे प्राध्यापक, विद्यार्थी, यापूर्वीचे कुलगुरू आणि अधिकार मंडळे, प्रशासनातील सहकारी या सर्वांच्या मेहनतीचे हे फळ आहे.

                            डॉ. संजीव सोनवणे, प्र- कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button