नाशिक : ‘वाहनसौख्य’ वेटिंगवर…! न्यायाधीशांकडील सेटिंगलाही अपयश | पुढारी

नाशिक : ‘वाहनसौख्य’ वेटिंगवर...! न्यायाधीशांकडील सेटिंगलाही अपयश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना महामारीच्या तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे केले जात असल्याने उद्योजक, व्यापार्‍यांसह ग्राहकांमधील उत्साह सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. कारण गेल्या दोन वर्षांत नवीकोरी चारचाकी घेण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने, दसरा-दिवाळीनिमित्त ते साकार करण्याचा अनेकांचा मानस आहे. मात्र, अगोदरच सेमीकडंक्टर चिपचा तुटवडा आणि कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा ही दोन कारणे आव्हाने ठरत असतानाच अचानक वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा करणे कंपन्यांना अवघड होताना दिसत आहे. विशेषत: एसयूव्ही कारला मोठी वेटिंग सांगितली जात आहे.

भारतीय वाहन बाजार आता कोरोना आणि लॉकडाऊनच्या प्रभावातून मुक्त झाला आहे. वाहन बाजार आता पूर्णपणे रुळावर आला असून, सध्या बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. वाहनांची देशभर मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यातच आता सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यापासून विक्री आणखी वाढली आहे. तसेच विक्री वाढवण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या वेगवेगळ्या वाहनांवर डिस्काऊंट ऑफर्स देऊ लागल्या आहेत. परिणामी ग्राहकांची पावले वाहनांच्या शोरूम्सकडे वळू लागली आहेत. असे असले तरी वाहन उत्पादक कंपन्यांसमोर सेमीकडंक्टर चिपचा तुटवडा आणि कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा ही दोन आव्हाने आहेत. वाढती मागणी अन् कच्च्या मालाचा तुटवडा यामुळे वाहनांचे प्रॉडक्शन मंदावलेले आहे. परिणामी अनेक लोकप्रिय वाहनांच्या डिलिव्हरीसाठी उशीर होत आहे. देशातील अनेक लोकप्रिय कार्सवरील वेटिंग पीरियड हा एक वर्षाच्या पुढे गेला आहे. विशेषत: एसयूव्ही सेक्शनमध्ये कार तत्काळ उपलब्ध करून देणे अवघड होत आहे. सध्या सणासुदीनिमित्त मोठ्या प्रमाणात चारचाकी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. मात्र पारंपरिक कारऐवजी एसयूव्ही कारला विशेष पसंती दिली जात असल्याने, बहुतांश ग्राहकांचा कल या कार खरेदीकडे आहे. विशेषत: तरुणवर्गात या कारविषयी प्रचंड आकर्षण बघावयास मिळत आहे. अशात मात्र पुरवठा कमी असल्याने, अनेकांना बुकिंग करून प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे अनेकांनी दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर बुकिंगला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. दिवाळीमध्येदेखील अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असली तरी, ज्या ग्राहकांनी दिवाळीचा विचार करून कार बुकिंग केल्या आहेत, अशा ग्राहकांना दिवाळीच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी करण्याचे शोरूम्स चालकांसमोर आव्हान आहे.

न्यायाधीशांकडेच लावली सेटिंग
शहरातील एका उद्योजकाने एसयूव्ही कार बुक केल्यानंतर त्यांना सहा महिन्यांची वेटिंग असल्याचे सांगितले गेले. मात्र, वेळेत कारची डिलिव्हरी मिळावी म्हणून या उद्योजकाने बरेच प्रयत्न केले. सर्वच प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी नातेसंबंध असलेल्या एका न्यायधीश महोदयानांच कार लवकर मिळावी याकरिता सेटिंग लावली. परंतु त्यातही अपयश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button