सांगली : हस्तिदंत विक्री करणारी टोळी गजाआड | पुढारी

सांगली : हस्तिदंत विक्री करणारी टोळी गजाआड

जतशहर, पुढारी वृत्तसेवा : खरशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथे हस्तिदंताची तस्करी करणारी टोळी कवठेमहांकाळ पोलिसांनी गजाआड केली. त्यांच्याकडून 20 लाख रुपये किमतीचेे हस्तिदंत जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी राहुल भीमराव रायकर (वय 26, रा. संकपाळ गल्ली, कसबा बावडा कोल्हापूर), बालाजी हरिश्चंद्र बनसोडे (वय 30, रा. विजयनगर, कोल्हापूर), कासिम शमशूमुद्दीन काझी (वय 20, रा. खाजा वस्ती, मिरज), हणमंत लक्ष्मण वाघमोडे (वय 39, रा. पांडेगाव, ता. अथणी, जि. बेळगाव) यांना अटक केली आहे, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी जत येथे पत्रकार बैठकीत दिली.

अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले म्हणाल्या, हस्तिदंताची तस्करी करणारी टोळी हस्तिदंत विक्रीसाठी दंडोबा डोंगराजवळ येणार असल्याची माहिती गोपनीय खबर्‍यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे, सहायक पोलिस फौजदार विजय घोलप, अमरीश्या फकीर, केरबा चव्हाण यांनी दंडोबा

डोंगर या ठिकाणी सापळा रचला होता. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दंडोबा डोंगराकडे जाणार्‍या रस्त्यालगत एका मठासमोर झुडपात लपून बसलेल्या राहुल रायकर, बालाजी बनसोडे, काशीम काझी, हनमंत वाघमोडे यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील वीस लाख किंमतीचे हस्तिदंत जप्त केले आहेत. तसेच त्यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 2.39.48 , अ 49.49 ब 50 सह 51 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.

संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दूबुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

Back to top button