यशवंत चारा पिकाच्या लागवडीचे तंत्र | पुढारी

यशवंत चारा पिकाच्या लागवडीचे तंत्र

यशवंत चारा पिकाच्या लागवडीचे तंत्र – विलास कदम

महाराष्ट्रात वाढते दुग्धोत्पादन उल्लेखनीय आहे. त्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे शेतकर्‍यांनी नवीन चारा पिकाची लागवड केली आहे. महाराष्ट्राच्या बर्‍याच भागात मका, ज्वारी, ओट आणि लसूणघास मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यापैकी बर्‍याच भागात हंगामी प्रकारची चारा पिके घेतली जातात. त्यामुळे पुढील हंगामात पुन्हा चार्‍याचा प्रश्न डोके वर काढतो, यावर उत्तम उपाय म्हणजे बहुवार्षिक चारा पीक घेणे गरजेचे ठरते. याकरिता यशवंत या चार्‍याच्या जातीची लागवड करणे फायदेशीर ठरते. हा हत्ती गवत आणि बाजरी यांच्या मिलनातून तयार झालेला संकरित वाण आहे. यामध्ये प्रथिने 10.57 टक्के असून पचनशक्ती 63 टक्के आहे. या वाणात कापणीनंतर लवकर वाढ होते, अधिक फुटवे येतात. हिरव्या आणि वाळलेल्या पाल्याची पचनशक्ती जास्त आहे. शेतकरी बांधवांनी यशवंत जातीचा चारा लावाताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात म्हणजे उत्पादन वाढ होण्यास मदत होईल.

जमीन आणि मशागत : हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत येते. मध्यम ते भारी जमीन चांगल्या निचर्‍याची आणि ज्या जमिनीचा सामू पाच ते आठ आहे, अशा जमिनी या पिकासाठी चांगल्या ठरतात. या पिकासाठी जमीन तयार करताना एक खोलगट नांगरट करावी आणि दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. नंतर त्यावरील तण गोळा करून त्याची विल्हेवाट लावावी.
लागवड पद्धत : तयार झालेल्या शेतात 90 सेंटिमीटर किंवा तीन फुटांवर सर्‍या पाडाव्यात. प्रत्येक बेणे (कांडी) वर तीन डोळे आहेत की नाही हे पाहावे. त्यानंतर तीन डोळे असणार्‍या कांड्या दोन किंवा तीन फूट अंतरावर सरीत बगलेत दोन डोळे जमिनीत आणि एक डोळा जमिनीवरती राहील अशा पद्धतीने लावावा. प्रत्येक ठिकाणी एक कांडी लावली तर प्रति हेक्टरी 12 हजार पाचशे कांड्या लागतात तर प्रत्येक ठिकाणी दोन कांड्या लावल्या तर प्रति हेक्टरी 25,000 कांड्या लागतात. हे वाण जून ते ऑगस्ट किंवा फेबु्रवारी ते मार्चमध्ये लावल्यास उत्पादन जास्त येते. फक्त जास्त थंडीच्या काळात त्याची लागवड करणे टाळावे.
खत व्यवस्थापन : लागवडीपूर्वी शेतात जवळपास 50 गाड्या शेणखत टाकावे. लागवडीच्या वेळी 50 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाश या पिकास देणे गरजेचे आहे. प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे म्हणजे उत्पादन वाढते.
लागवडीनंतर घ्यावयाची काळजी : लागवडीनंतर पिकाच्या वाढीच्या काळात सुरुवातीच्या दोन खुरपण्या कराव्यात. प्रत्येक वर्षी एका ठिकाणी दोन-तीन फुटवे ठेवून बाकीचे कापून घ्यावीत आणि पुढील लागवडीसाठी वापरावीत. खरीप हंगामात गरजेनुसार तीन आठवड्याने पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी प्यावे.
कापणी आणि उत्पादन : यशवंत गवताची पहिली कापणी लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या 30 ते 35 दिवसांनी कराव्यात. कापणी करताना एक काळजी घ्यावी. ती म्हणजे कापणी जमिनीपासून पंधरा ते वीस सेंटिमीटरच्या वर करावी. पूर्ण वर्षात या पिकाच्या 8 ते 9 कापण्या होतात. या वाणापासून प्रतिवर्षी जवळपास 200 ते 250 टन हिरवा चारा मिळू शकतो.
– विलास कदम

Back to top button