‘तिथे’ विकतो जळालेला पाव! | पुढारी

‘तिथे’ विकतो जळालेला पाव!

लंडन : कुणाला काय आवडेल हे काही सांगता येत नाही. इतर अनेक गोष्टींप्रमाणे जेवणाची अभिरूचीही सध्या बदलली आहे. बार्बेक्यू पद्धतीच्या चवीलाही सध्या पसंती मिळते आहे. आपल्याकडे बार्बेक्यू किंवा भाजलेल्या, करपट चवीचे अनेक पदार्थ मिळू लागलेत. अर्थात सरसकट कोणत्याही पदार्थाला बार्बेक्यूची चव भारतीय खाद्यसंस्कृतीला अजूनही मानवलेली नाही. एकीकडे भारतीय लोकांची ही आवड आहे, तर स्कॉटलंडमध्ये मात्र जळलेला किंवा करपलेला ब्रेडही अगदी सहज विकला जातोय.

स्कॉटलंडमधल्या ग्रेट मँचेस्टरमध्ये वरून जळलेले काळपट ब्रेड विकले जात आहेत. असे काळे ब्रेड खरं तर कोणालाच खायला आवडत नाहीत; पण काही जणांना मात्र कुरकुरीत व जळक्या स्वादाचे हे ब्रेड आवडत आहेत. स्कॉटलंडच्या ऑथेंटिक चवीमध्ये जास्त प्रमाणात भाजलेल्या या ब्रेडचा समावेश होतो. हे ब्रेड दिसायला अगदीच काळपट असतात. सोशल मीडियावर सध्या या ब्रेडचे फोटो पाहायला मिळतात.

स्कॉटलंडमध्ये सध्या अनेकांना या ‘वेल फायर्ड ब्रेड’चा स्वाद आवडतो आहे. हा वरून कुरकुरीत असतो; पण आतून एकदम सॉफ्ट असतो. तो वेल फायर्ड ब्रेड या नावानं ओळखला जातो. ग्रेट मँचेस्टरच्या मध्ये हा खास ब्रेड मिळतो. मँचेस्टरच्या फेसबुक ग्रुप्सवर या ब्रेडचे फोटो शेअर केले जात आहेत. यावर अनेकांच्या प्रतिक्रियाही येताहेत. काहींनी तर चक्क याला ‘क्रिमेटेड रोल’ असंही म्हटलंय. ज्यांनी अजूनही या ब्रेडचा स्वाद चाखलेला नाही, त्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं सांगितलं, की ‘माझ्या आईच्या मते, हा ब्रेड भाजलेला नाही, तर जळलेला आहे.’ काही यूझर्सनी मात्र ब्रेडची चव आवडल्याचं सांगितलं आहे. अशा पद्धतीचा जळका ब्रेड खावा की खाऊ नये यावरूनही अनेकांमध्ये संभ्रम आहे. स्कॉटलंडच्या फूड स्टँडर्ड एजन्सीने 2018 मध्ये लोकांना असं आवाहन केलं होतं, की असे जळके ब्रेड कमी प्रमाणात खावेत.

Back to top button