स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ : पन्हाळा शहराचा पश्चिम विभागासह राज्‍यात द्वितीय क्रमांक | पुढारी

स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ : पन्हाळा शहराचा पश्चिम विभागासह राज्‍यात द्वितीय क्रमांक

पन्हाळा ; पुढारी वृत्तसेवा – पन्हाळा नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ मध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला. पन्हाळा नगरपरिषदेस पश्चिम विभागामध्ये द्वितीय क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्यांमध्येही द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तालकटोरा स्टेडियम, न्यू दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीमध्ये पन्हाळा नगर परिषदेस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय शहर विकास व आवास मंत्री हरदीप सिंग पुरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

पन्हाळा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. रूपाली रवींद्र धडेल, तत्कालीन मुख्याधिकारी स्वरूप खारगे, मुख्याधिकारी विद्या कदम, रवींद्र धडेल, स्नेहल पन्हाळकर आणि अजित चौरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पन्हाळा शहरास सलग चौथ्यांदा ३ स्टार मानांकन प्राप्त झाले असून, तसेच ODF++ हा दर्जा सलग चार वेळेस मिळाला आहे.

मुख्याधिकारी विद्या कदम म्हणाल्या की, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण – २०१८ पासून सातत्याने आपली कामगिरी उंचावत शहराचा नावलौकिक वाढवला आहे. यासाठी सर्व नगरसेवक/ नगरसेविका, सर्व अधिकारी वर्ग, सफाई मित्र आणि सर्व नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. तत्कालीन मुख्याधिकारी स्वरूप खारगे म्हणाले की, सफाईमित्र आणि सर्व नागरिकांनी तसेच सर्व नगरसेवकांनी केलेल्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.

माजी नगराध्यक्षा सौ. रुपाली धडेल यांनी सांगितले की, “शहरातील सर्व नागरिक, सफाई मित्र आणि सर्व नगरसेवक/नगरसेविका यांच्या मेहनतीमुळे आणि सहकार्यामुळे सलग पाचव्यांदा हा पन्हाळा शहराचे नाव देशात उंचावल्‍याचे सांगितले. तसेच आमदार डॉ. विनय कोरे (सावकार) यांच्या मार्गदर्शनामुळे गेले पाच वर्ष हा पुरस्कार पन्हाळा शहरास मिळाला आहे.

हेही वाचा :   

Back to top button