बाळ मोठे होताना कसा असावा त्याचा आहार, जाणून घ्या अधिक | पुढारी

बाळ मोठे होताना कसा असावा त्याचा आहार, जाणून घ्या अधिक

एक वर्षानंतर बाळ तुम्हाला बर्‍यापैकी ओळखू लागते. आई-वडिलांनी आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त राहायला हवे. त्याला फिरायला नेणे, त्याच्याशी बोलणे, हसणं, खेळणं, हलक्या हाताने पाठ थोपटणे, मायेने गोंजारणे या गोष्टी गरजेच्याच आहेत. बाळाचे संगोपन करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास बाळ सुद़ृढ होईल. पूर्वीच्या काळी आतासारखी बालसंस्काराची पुस्तके जरी नसली तरी घरातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असायच्याच. कुटुंबातील आजी तिच्या बटव्यातून अनेक आयुर्वेदिक आणि घरगुती औषधे आणि आहाराचे नियम आपल्या सुना-लेकींना सांगत असत. पूर्वीच्या काळी स्त्रिया म्हणत असत की, मी माझ्या मुलाला हाताचा पाळणा करून मोठे केले. याचाच अर्थ लहानपणापासून त्याचा योग्य तो आहार आणि काळजी घेत असत.

आता काही स्त्रिया जन्मल्याच बाळाला बाटलीची सवय करतात; परंतु बाळाला अंगावरचे दूध पाजल्यास आई आणि मुलामध्ये भावनिक नाते घट्ट व्हायला सुरुवात होते. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या दिवशी स्तनातून चिकट द्रव बाहेर पडतो. तो बाळाला पाजला जात नाही, पण तोच सर्वात औषधी असतो. त्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते. अंगावरचं दूध हा बाळासाठी सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. बाळासाठी हे निसर्गाने पुरविलेले दूध असते. बााळाला अंगावरचे दूध पाजल्यामुळे त्याला विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर ठेवता येते. प्रामुख्याने जुलाब-हगवणीसारख्या आजारापासून त्याचप्रमाणे ‘क’ जीवनसत्त्वही अंगावरच्या दुधातून मिळत असल्यामुळे बाळाला त्याची कमतरता पडत नाही. ते निर्जंतुक असते. त्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात.

बाळ जसे मोठे होत जाईल तसे त्याच्या आहारात बदलही करायला हवा. बाळ 6 ते 8 आठवड्याचे झाले की त्याला फळांचा रस, सूप द्यायला सुरुवात करावी. 8 महिन्यांनंतर त्याला दोन-दोन तासांनी थोडा थोडा खीर, सूप, दूध, फळांचा रस द्यावा. साधारण वर्ष पूर्ण झाल्यानंतर नेहमीचे अन्न द्यायला हळूहळू सुरुवात करावी. बाळाला आहार देताना आईने फार आग्रह करू नये. अगदी बाळ ओकार्‍या काढेपर्यंत बळजबरीने खायला देऊ नये. त्याला निसर्गातील रंगांपासून ते खेळण्याच्या माध्यमातून रंगांची ओळख करून द्यावी. आई-वडिलांनी बाळाशी भावनिक नाते घट्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत.

डॉ. जयदेवी पवार

Back to top button