पुणे : पर्यटकांसाठी कोकण ‘हॉटस्पॉट’; महाबळेश्वरलाही मिळतेय पसंती | पुढारी

पुणे : पर्यटकांसाठी कोकण ‘हॉटस्पॉट’; महाबळेश्वरलाही मिळतेय पसंती

सुनील जगताप
पुणे : राज्यातील कोकण परिसराला पर्यटनाच्या दृष्टीने अधिक पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर, नाशिक, औरंगाबादमधील लोणार आदी स्थळांकडे पर्यटकांचा अधिक कल असला, तरी त्यामधून कोकणच अधिक हॉटस्पॉट ठरले आहे. सुट्या सुरू होताच अनेक घरांत पर्यटनाचे बेत आखले जातात. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील पर्यटकांसाठी कोकण हे नेहमीच सुटीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन असते. आंबा, फणस, करवंद, जांभूळ अशा कोकणच्या मेव्यासह समुद्रकिनारी साहसी खेळांची मजा लुटता येते. त्यामुळे अलीकडच्या काळात कोकणची सहल विशेष ठरते आहे.

उसळणार्‍या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनार्‍यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंगमुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडीमुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो.
धार्मिक पर्यटन करणार्‍यांसाठी गणपतीपुळे, कुणकेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिर, परशुराम मंदिर असे अनेक पर्याय आहेत. गणपतीपुळे येथे राहण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे.

गडकिल्ले पाहणार्‍यांसाठी सिंधुदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग हे किल्ले साद घालतात; तर समुद्र किनार्‍यावर मौजमजा करणार्‍या पर्यटकांसाठी तारकर्ली, तोंडवली, चिवला, वेंगुर्ला, गणपतीपुळे, मालवण असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय सर्वच गावांमधील मंदिरे, जुनी घरे, छोट्या वाड्या हे सारेच पाहण्यासारखे असते. महाबळेश्वर, पाचगणी येथेही पर्यटकांची अधिक पसंती आहे. लोणावळा, नाशिकबरोबरच औरंगाबाद येथील लोणारे येथेही पर्यटकांकडून अधिक पसंती मिळाली आहे.

पर्यटन सप्ताहातंर्गत विविध उपक्रम
‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा तसेच व्याख्यानमाला, कलाकारांच्या कलेतून प्रबोधन आदीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ऐतिहासिकस्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरेथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती येथे पदभ—मंती आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचबरोबर पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ—मंती असे उपक्रम राबविले आहेत.

रेल्वेच्या गाड्यांना वेटिंग
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई, पुणे रेल्वे स्थानकासह विविध स्थानकांवरून दक्षिण भारत आणि उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना दोन ते तीन महिन्यांचे ‘वेटिंग’ आहे. अनेक रेल्वे प्रवाशांनी पर्यटनासाठी आगाऊ रेल्वेचे तिकीट बुकिंग करून ठेवल्याने अनेक महत्वाच्या पर्यटनस्थळी जाणार्‍या रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक सध्याच्या काळात भ—मंतीला मोठा प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.

 

Back to top button